500 कोटी कोणी घेतले? क्लिपच्या आडून नेमका डाव काय? ऑडिओ क्लिपवर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
ऑडिओ क्लिपवर मंत्री उदय सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री सामंत यांनी ओडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप शेअर केल्यानंतर महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या ऑडिओ क्लिपशी शिंदे गटाचा संबंध नाही, असं स्पष्टीकरण देत रामदास कदम यांनी हात झटकले आहेत. याच ऑडिओ क्लिपवरून आता मंत्री उदय सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देखील या ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी केली आहे.
मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाष्य केलं. सामंत म्हणाले, ‘ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित नेत्यांची नावे आहेत. मी शिवसेनेच्या वतीने मागणी करतो की, या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी. या क्लिपमध्ये मराठा आंदोलनाबाबत उल्लेख आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. जे आंदोलन चांगल्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी हाताळलं होतं. या ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ती ऑडिओ क्लिप कुणी रेकॉर्ड केली. मराठा आंदोलनासंदर्भात काय प्रयत्न होता. ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होता का? याची चौकशी केली पाहिजे. ही ऑडिओ क्लिप खरी असेल, तर ही दुर्दैवी बाब आहे. त्यातील चर्चा ही श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित नाही. सर्व गोष्टींचा उहापोह करण्यात आला आहे. त्यांचा संबंध नसताना त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचं नाव घेतल्याने एकनाथ शिंदे बदनाम होतील, अशा पद्धतीचे षडयंत्र पाहायला मिळतंय. ही फार दुर्दैवी बाब आहे. ही ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे’.
‘सायबर आणि एसआयटी चौकशी झाली पाहिजे. त्यांचा आवाज खरा की खोटा… हे तपासले पाहिजे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजासाठी चांगले काम करत आहेत. अशा पद्धतीने षडयंत्र रचणे, हे खरं आहे का? यातील एक उल्लेख वाचतो. दोन महत्वाची गोष्ट सांगतो. एक महिला श्रीकांत शिंदे यांनी जरांगे यांना दिल्याचे सांगतंय. या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. आमची देखील चौकशीची मागणी आहे. ऑडिओ क्लिपशी संबंधित व्यक्तीची चौकशी केली पाहिजे. पहिल्यांदा खरं की खोटे हे तपासले पाहिजे. पैसे देणे आणि घेण्याचा विषय आधीच संपला आहे. या क्लिपमधून षडयंत्र करणे, गैरसमाज निर्माण करणे याची चौकशी केली पाहिजे. यातील आवाज फॉरेन्सिकमध्ये पाठवले पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.