शरद पवारांचा शिलेदार थेट भाजपच्या व्यासपीठावर, पुणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचारात देखील रंगत आली आहे. याच दरम्यान आता राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदार संघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ यांचा समावेश आहे. दरम्यान या पाचही जागांवर कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर याच मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून सचिन सानप यांची शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे या मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं आहे.
परंतु दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन आमदारांनी तर शेकापच्या एका आमदारने या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे, असा दावा भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा ही भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचा मोठा दावा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे. पुणे पदवीधरसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार उभे असल्याने आमदार नारायण पाटील कन्फ्यूज झाले असावेत असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आज पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या बार्शीतील मेळाव्याला आमदार नारायण पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
