Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय

Vidhan Parishad Election : "विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही….. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही" विधान परिषदेची संधी हुकल्यानंतर कवितेच्या या ओळींमधून व्यक्त झालेला भाजप आमदार पुन्हा पक्षात त्याचं जोमाने सक्रीय.

Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय
Mla sanjay kenekar
| Updated on: May 01, 2026 | 2:30 PM

दोन दिवसांपूर्वी भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर केली. पण त्यात नाव नसल्यामुळे भाजपचे विधान परिषदेवरील एक विद्यमान आमदार नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांनी व्हॉट्स अप स्टेटसवर कविता ठेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही….. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही..” अशी ती कविता होती. भाजपचे ते आमदार म्हणजे मराठवाड्यातून येणारे संजय केनेकर. विधान परिषदेवर त्यांना फक्त 13 महिने संधी मिळाली.

मागच्यावर्षी मार्च महिन्यात त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली होती.पाचवर्षाचा कालावधीही त्यांना पूर्ण मिळाला नव्हता. त्यामुळे संजय केनेकर यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता होती. पण भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील भेंडे, विवेक कोल्हे यांना भाजपने संधी दिली. त्यामुळे संजय केनेकर यांनी आपल्या मनातील भावना कवितेच्या ओळींच्या रुपातून व्यक्त केल्या होत्या.

अंबादास दानवे हे शेतातील बुजगावणे

पण आता त्यांच्या मनात नाराजी राहिलेली नाही. ते पुन्हा भाजपमध्ये त्याचं जोशाने सक्रीय झाल्याचे दिसत आहे. “भाजपाला आव्हान देण्याचा दम कोणातही राहिला नाही. अंबादास दानवे हे शेतातील बुजगावणे आहेत” अशा शब्दात भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी अंबादास दानवे यांच्या निवडीवर टीका केली. कामगार दिनानिमित्त भाजपाच्या वतीने मिठाई वाटप करत कामगारांचा सत्कार केला.

35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत

महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. अंबादास दानवे आणि संजय केनेकर दोघे छत्रपती संभाजी नगरमधून येतात. संजय केनेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख आहे. संजय केनेकर हे मागच्या 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी भाजपमध्ये वेगवेगळी पद, जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत.

Follow Us