अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू, धक्कादायक घटनेमुळे अकोला हादरलं

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर आज दुपारी काही मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यामध्ये जय मालोकार नावाच्या तरुणाचादेखील समावेश होता. या जय मालोकार याला राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू, धक्कादायक घटनेमुळे अकोला हादरलं
मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा मृत्यू
| Updated on: Jul 30, 2024 | 9:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. अमोल मिटकरी अकोल्यात विश्राम गृहात गेले असताना बाहेर उभ्या असलेल्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं होतं. यावेळी चांगलाच राडा झाला होता. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे जयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जय मालोकार हा 28 वर्षांचा होता. त्याला आज दुपारच्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. यानंतर त्याला अकोल्यातली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जय मालोकार याला हृदय विकाराचा झटका येईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. पण जय मालोकारला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जय मालोकार याच्या मृत्यूनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आंदोलनानंतर जय मालोकारच्या छातीत दुखायला लागलं. त्यावेळेला आमचे काही कार्यकर्ते त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. त्याचं वय केवळ 28 इतकं होतं आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा त्याचं इसीजी काढण्यात आलं. त्यामध्ये समजलं की त्याला हृदय विकाराचा मोठा झटका आला आहे. त्यानंतर त्याला तातडीने एन्जोग्रॉफीसाठी आयसीयूत नेलं गेलं. पण एन्जोग्रॉफी करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मला मिळाली आहे. आमच्या पक्षाचे सरचिटणीस अकोल्याला पोहोचले आहेत. ते आमच्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत”, अशी प्रतिक्रिया जय मालोकार यांनी दिली.