
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील शेकापच्या सभेत बोलताना रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांविरुद्ध संताप व्यक्त केला होता. छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात? असा सवाल राज ठाकरेंनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला केला होता. यानंतर काही तासांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रा बारची तोडफोड केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल तालुक्यातील कोन गावातील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर दगडफेक करत फोडाफोड केली. यात बारमधील फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी काही मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत.
ऑर्केस्ट्रा बारची तोडफोड करणारे मनसे पदाधिकारी किरण गुरव म्हणाले की, ‘राज साहेबांनी काल आदेश दिला होता, त्यानंतर आम्ही बार फोडले. खर तर योगेश चिल्ले यांचं मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर पनवेलमध्ये अश्लीलता असलेले बार सुरू आहेत नको त्या सर्विसेस देखील मिळतात. हा बार अधिकृत होता की नाही ती गोष्ट जाऊ द्या. मात्र पनवेलमध्ये बहुतेक बारमध्ये अश्लीलता चालते. त्यामुळे सरकारने ताबडतोब याकडे लक्ष द्यावं आणि हे बार बंद करावे
मनसेच्या या कारवाईवर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ‘जेव्हा राज साहेब एखादा मुद्दा मांडतात त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक नेहमीच करत असतात. त्यामुळे तो मुद्दा राज साहेबांनी आपला भाषणामध्ये मांडल त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिकांनी केली. जे अनधिकृत बार आहेत सरकारने तोडले पाहिजेत. आम्ही तोडायची काय गरज? सरकार बसून काय करतयं?’ असा सवालही देशपांडेंनी विचारला आहे.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर डान्स बार तोडफोड प्रकरणावर भाष्य केलं आहे. भोयर म्हणाले की, ‘या राज्यामध्ये कुठही अवैधप्रमाणे डान्सबार किंवा इतर कुठलीही गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतल्या जाणार नाही. मात्र या पद्धतीने कायदा हातात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे हे देखील योग्य नाही.
पुढे बोलताना भोयर म्हणाले की, एखाद्या ठिकाणी अशा पद्धतीचा काही प्रकार सुरू असेल तर त्याची तक्रार शासनाकडे किंवा प्रशासनाकडे द्यावी. प्रशासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल. ज्यांनी ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही मंत्री पंकज भोयर यांनी म्हटलं आहे.