47 व्या वर्षी गादी कारागीर दहावी उत्तीर्ण, तर कर्णबधीर विद्यार्थिनीचे दहावीत 94 टक्के

दहावीचा निकाल जाहीर होताच मोहम्मद जमील उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलाने संगणकावर निकाल पाहून ही आनंदाची बातमी दिल्यानंतर त्यांनी परिवार आणि मित्रांसोबत पेढे वाटून आनंद साजरा केला..

47 व्या वर्षी गादी कारागीर दहावी उत्तीर्ण, तर कर्णबधीर विद्यार्थिनीचे दहावीत 94 टक्के
Mohammed Jamil Noor Mohammed, Washim
| Edited By: | Updated on: May 08, 2026 | 5:31 PM

शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते. माणूस आयुष्यभर शिक्षण घेऊ शकतो. गादीचा व्यवसाय करणाऱ्या एका कारागिराने वयाच्या ४७ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अपयशाने खचणाऱ्या तरुणांसमोर नवे उदाहरण दिले आहे. त्यांनी ३१ वर्षांनंतर दहावीचा अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील ४७ वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात यश संपादन केले आहे. त्यांना ५४.२० टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. १९९५ मध्ये दहावीत अपयश आल्यानंतर त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. मात्र, शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवत त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा दिली.

याबाबत मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी तरुणांनी थोड्याशा अपयशाने हार मानू नये असा संदेश दिला आहे. आपण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यावेळी शिक्षण नीट घेऊ शकलो नाही. परंतू आता जबाबदारीतून थोडा वेळ मिळाल्याने पुन्हा अभ्यास केला आणि दहावी पास झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांची तीनही मुले उच्चशिक्षित असून मोठा मुलगा कर्नाटकात डॉक्टरी, दुसरा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे तर धाकटा मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या मुलांना खूप उत्सुकता होती की त्यांचे वडील पास होतात की नाही मात्र, मी पास झाल्याचे पाहून मुलांना खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. आता आपण पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले

रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरात राहणारे मोहम्मद जमील नूर मोहम्मद हे गादी तयार करण्याचा व्यवसाय करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १९९५ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. मात्र अपयश आल्यानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. त्यानंतर संसार आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्यांमध्ये शिक्षण मागे पडले. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम मनात होती. अखेर त्यांनी पुन्हा धाडस करून अभ्यास सुरू केला आणि यंदा दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३१ वर्षांनंतर आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रावर बसून त्यांनी परीक्षा दिली. त्यांच्या या निर्णयाचे अनेक विद्यार्थ्यांनी कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

लिप मोमेंटवरुन शिकली, दहावीत 94 टक्के गुण मिळवले

दरम्यान, नागपूरच्या शांभवी पंचबुद्धे हिने इयत्ता दहावीत 94 टक्के गुण मिळवले आहेत. पूर्ण श्रवणशक्ती गमावलेली असतानाही शांभवीने घवघवीत यश मिळवलं आहे. शांभवीने सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेत जिद्दीच्या जोरावर 10 च्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवले. शांभवी नागपूरच्या सोमलवर शाळेची विद्यार्थीनी आहे. शांभवी पाचव्या वर्गात असताना तिला कफचा त्रास सुरू झाला होता.  त्यावेळी कोरोना असल्याने तिचे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. कफचा परिणाम शांभवीच्या श्रवण शक्तीवर झाला.  शिक्षक आणि मित्र-मैत्रिणीच्या केवळ लिप मोमेंटवरून शांभवी शिकायची. अभ्यासासाठी तिला थोडा जास्त वेळ लागायचा. भविष्यात शांभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे आहे, असं शांभवी हीने म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us