
इराण युद्धामुळे पेट्रोल टंचाईच्या अफवा पसरत असताना एक मोठी घटना घडली आहे.अंबरनाथ येथील सारंग पोळके यांनी दुपारी कामावर येताना त्यांच्या मोटार सायकलची पेट्रोल टाकी फूल केली. मात्र अशा प्रकारे मोटार सायकलीची टाकी पूर्ण करणे त्यांच्या जीवावर बेतले असते. कारण उन्हाळ्यात त्यांच्या मोटार सायकलीच्या पेट्रोल टाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. त्यांना पायाला उष्णता लागल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी बाईक रस्त्याच्याकडेला थांबवली आणि मोटर सायकली अचानक पेट घेतला.
सध्या पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे त्यांच्या दुचाकीला आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना अंबरनाथ येथील नवरेनगर बस स्टॉपजवळ घडली आहे.
अंबरनाथचे रहिवासी सारंग पोळके यांनी आज दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरले होते. त्यानंतर सारंग पोळके हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या पायाला गरम लागू लागल्यान त्यांनी रस्त्याच्याकडेला मोटार सायकल थांबविली. त्यानंतर त्यांच्या बाईकला अचानक आग लागली. यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन मोटार सायकलीची आग विझवण्याचाही प्रयत्न केला. पण बाईकची टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. अशावेळी मोटार सायकलीची टाकी फुल केल्यामुळे उष्णता निर्माण होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता टाकी संपूर्ण भरुन पेट्रोल भरु नये. तसेच उन्हात मोटार सायकल चालवताना आपली आणि आपल्या वाहनांची काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिक ठिकाणी पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चिखली येथील एका पंपावर ग्राहक चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेल घेऊन गेल्याचा प्रकार घडला आहे. इतरही ग्राहक पंपावर मिळेल ते प्लास्टिकचे डब्बे घेऊन रांगेत उभे असलेले दिसले. दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले आहेत. तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.आता प्रशासना अशा लोकांवर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल वितरणाबाबत कडक निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात पेट्रोल पंपावर कॅन, बाटली, डबा किंवा इतर भांड्यात पेट्रोल, डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे.आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही नवीन नियमावली जारी झाली आहे. जिल्ह्यातील पंप चालकांना पेट्रोल, डिझेल देताना वाहनांच्या टाकीतच इंधन देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्याभरात पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल, डिझेलच्या विक्री नोंदणी नियमित ठेवण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाचे दिले आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापक यांना आदेश दिले आहेत. नियमांचे पालक न करणाऱ्या पेट्रोल पंप चालक, व्यवस्थापकांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.