कळश्या, भगुनी, निळ्या रंगाचा ड्रम आताच भरून ठेवा, वांद्र्यापासून खारदांड्यापर्यंत 14 तास पाणी बंद राहणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १० फेब्रुवारी २०२६ रोजी वांद्रे पश्चिम येथील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत, एकूण १४ तास एच-पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळेल. नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कळश्या, भगुनी, निळ्या रंगाचा ड्रम आताच भरून ठेवा, वांद्र्यापासून खारदांड्यापर्यंत 14 तास पाणी बंद राहणार
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 07, 2026 | 1:48 PM

फेब्रुवारी महीना सुरू झालाय, तरी आत्ताच उन्हाची तलखी जाणवायला लागली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेमही सुरू झाला असून आता मुंबईतील वांद्रे वासियांसाठी देखील महत्वाची बातमी समोर आली आहे. वांद्रे (पश्चिम) येथे 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तब्बल 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत मी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाली हिल जलाशयाच्या 900 मिलिमीटर व्यासाच्या आवक (Inlet) जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीची अत्यावश्यक कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. हे काम मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 पर्यंत म्हणजे एकूण 14 तास होणार आहे. ही कार्यवाही वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळ, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येणार आहे. या दुरुस्ती कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ तास बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

त्यामुळे एच पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच मंगळवारी या दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

कुठे कुठे बंद राहणार पाणी ?

पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणारा परिसर :

१) वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, पेरी मार्ग, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, सेंट अँड्र्यूज मार्ग, सेंट पॉल मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर.

२) खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी, खार पश्चिमेचा काही भाग

३) हनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, कार्टर मार्ग, युनियन पार्क रस्ता क्रमांक 1 ते 4, पाली हिल

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पाली पठार झोपडपट्टी, खारमधील १५ वा ते २० वा रस्ता परिसर

५) वांद्रे पश्चिमचा काही भाग म्हणजे चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, डॉ. पीटर डायस मार्ग, सेंट जॉन बॅप्टिस्ट मार्ग

६) माउंट मेरी कॅथेड्रल, वांद्रे पश्चिम बाजूचे क्षेत्र रस्ता परिसर.

७) वांद्रे पश्चिम के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग, बाजार रस्त्याचा काही भाग, ए. के. वैद्य मार्ग

८) झिगझॅग मार्ग, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्ग

पाणीपुरवठा कमी दाबाने होणारा परिसर

हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी. (मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us