Mumbai Local : मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, प्रवाशांचे मेगाहाल
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी हाती आलीये. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या ठाणे-मुलुंडदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. मध्य रेल्वेनंतर आज शनिवारी सकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यांना ऑफिसवर उशिरा जाण्याची वेळ आली.
काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावरून कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या अनेक लोकल ट्रेन मुलुंड स्थानकाजवळ थांबल्या होत्या. सिग्नल यंत्रणेत बिघड झाल्यानंतर एका तासांहून अधिक वेळ लोकल ट्रेन एकाच जागी थांबल्या होत्या. यामुळे अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकून बसले होते.मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गवर देखील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ओव्हरहेड वायर बिघाडामुळे लोकल सेवा झाली होती ठप्प
हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक ही अर्ध्या तासाने सुरळीत झाली. हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या काही वेळापासून ठप्प झाल्या होत्या. ओव्हरहेड वायरवर कपडा पडल्याने बिघाड झाल्याने ही वाहतूक खोळंबली होती. पनवेल ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या सध्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. आता प्रशासनाच्या वतीने ही त्रुटी दूर करून रेल्वे पुन्हा सुरू झाल्या.
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मुंबई उपनगरी मार्गावरील रुळांची दुरुस्ती करणे, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या बोरीवली आणि भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. परंतु पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) नसणार आहे.