
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा दाट शक्यता आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. झोन 4 पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या शाळकरी मुलांना वाचवले आहे. ज्याची फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्यानंतर पोलिसांवर काैतुकांचा जोरदार वर्षाव होताना दिसतोय. मुलांना बसमधून काढून कंबरेवर घेऊन गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना मुंबई पोलिस दिसत आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना अर्धा दिवसाची सुट्टी देण्यात आली.
माटुंगा पोलिस ठाण्याजवळ डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली. बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि चालक जवळजवळ एक तास अडकले होते. जागरूक नागरिकांनी डीसीपी झोन 4 ला परिस्थितीची माहिती दिली. तात्काळ कारवाई करून माटुंगाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन मिनिटांत सर्वांना वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलांची भिती काढण्यासाठी त्यांना बिस्किटे देखील दिली.
डीसीपी रागसुधा आर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलिस कर्मचाऱ्यांचे आता काैतुक होताना दिसतंय. कारण व्हिडीओमध्ये पोलिस हे मुलांना सांभाळून पाण्यातून कडेवर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत. दुसरीकडे अंधेरीमध्ये अडकलेली मर्सिडीज कार टोइंग व्हॅनच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. मर्सिडीज कार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोइंग व्हॅन बोलावण्यात आली होती. पावसाचा धोका असून टळलेला नाहीये.
आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रातील घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्याला आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील जोरदार पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळत आहे. पुण्याच्या घाटमात्याला आज आणि उद्या रेड अलर्ट तर पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.