मुंबईतील आंदोलनावर शिंदेंचा खासदार संतापला, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी आणि जनजीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त करून, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मुंबईतील आंदोलनावर शिंदेंचा खासदार संतापला, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
eknath shinde and devendra fadnavis
| Updated on: Sep 04, 2025 | 3:26 PM

ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले. यानिमित्ताने मुंबईतील आझाद मैदानात लाखो मराठा बांधव एकत्र आले होते. सलग पाच दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे मुंबईकरांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले. यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. तसेच गणेशोत्सवादरम्यान झालेल्या या आंदोलनामुळे विविध गणेशभक्तांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. आता याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे.

मुंबईच्या राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील वारंवार होणाऱ्या निदर्शनांमुळे होणाऱ्या गैरसोयीवर मिलिंद देवरा यांनी पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे. आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील इतर भागांत होणारी ही आंदोलने शहराच्या बाहेर हलवावी. जेणेकरून प्रशासकीय कामकाज आणि जनजीवनावर होणारा परिणाम कमी होईल, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी पत्रात केली आहे. मिलिंद देवरा यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजी हे पत्र लिहिले आहे.

पत्रात नेमकं काय?

मुंबई हे राज्याचे आणि देशाचे एक महत्त्वाचे आर्थिक आणि राजकीय केंद्र आहे. मंत्रालय, विधानभवन, पोलीस आयुक्तालय, नौदलाचे मुख्यालय तसेच अनेक महत्त्वाच्या बँका आणि कंपन्यांची कार्यालये अशा अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारती या भागात आहेत. ज्यामुळे प्रशासकीय कामे चालतात. बँका, मोठे उद्योग आणि महत्त्वाच्या संस्थांवर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. पण आंदोलनांमुळे कामकाज थांबते आणि सर्वांना त्रास होतो.

आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला, तरी त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळणे महत्त्वाचे आहे. रस्ते बंद होणे, वाहतूक थांबणे अशा समस्यांमुळे सामान्य लोकांना कामावर जाणे किंवा दैनंदिन व्यवहार करणे कठीण होते. त्यामुळे शहरातील सुव्यवस्था आणि कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही आंदोलने दक्षिण मुंबईच्या उच्च-सुरक्षा क्षेत्रातून हटवून शहराच्या इतर भागांत स्थलांतरित करावीत. यामुळे सर्वांचे हक्क जपले जातील आणि मुंबईचे कामकाज सुरळीत चालू राहील, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

आता त्यांच्या या पत्रावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे; मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्र्याना लिहिले. बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा! असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र मिलिंद देवरांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.