नाशिकमध्ये भाजप मोठी राजकीय खेळी करणार हे अजित पवार यांना आधीच माहित होतं?

| Updated on: Jan 13, 2023 | 10:00 PM

"दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या", असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये भाजप मोठी राजकीय खेळी करणार हे अजित पवार यांना आधीच माहित होतं?
अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Padvidhar Election) दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आपण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अलर्ट केलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. “वेगळा पर्याय होईल हे कानावर आलं होतं. त्याचवेळी मी थोरातांना अलर्ट केलं होतं”, असं स्पष्ट विधान अजित पवारांनी केलंय.

“दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

“तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आधल्या दिवशी सांगितलेलं होतं. ते म्हटले की, तुम्ही काळजी करु नका”, असं अजित पवारांनी सांगितलं

हे सुद्धा वाचा

“आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

सत्यजित तांबेंची अपक्ष उमेदवारी ही फडणवीसांची राजकीय खेळी?

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कुशलपणे राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे भाजपने उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. याशिवाय या घडामोडींमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि तांबे यांच्या कुटुंबात गृहकलह सुरु असल्याची चर्चा आहे.

सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती करणार असल्याचं विधान केलंय. या दरम्यान सत्यजित यांना काँग्रेसने पाठिंबा दिला नाही आणि भाजपने पाठिंबा दिला तर तांबे कायमचे भाजपचे होऊ शकतात. त्यामुळे ही देवेंद्र फडणवीस यांची अतिशय नियोजनबद्ध राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.