50 वर्षांच्या लढ्याला शेतकरी वैतागले, आता राज्य महामार्गाची एक मार्गिका केली बंद?

| Updated on: Apr 11, 2023 | 3:00 PM

आपल्या हक्कासाठी ५० वर्षांपासून लढा देणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीकडून झालेली चूक दुरुस्त होत नसल्याने शेतकऱ्यांनी राज्य महामार्गाची एक मार्गीका बंद केली आहे. या बाबत शेतकऱ्यांनी एमआयडीसीला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला

50 वर्षांच्या लढ्याला शेतकरी वैतागले, आता राज्य महामार्गाची एक मार्गिका केली बंद?
राज्य मार्ग बंद करताना शेतकरी
Follow us on

निनाद करमरकर, अंबरनाथ : शेतकऱ्यांना आपल्या एखाद्या कामासाठी वर्षानुवर्ष लढा द्यावा लागतो. त्यानंतर त्यात यश येत नाही. शेतकऱ्यांचे १९७२ पासून सुरु असलेला लढा अजूनही संपलेला नाही. हा लढा भूसंपादनात एमआयडीसीनं केलेल्या चुकीमुळे आहे. एक जागा संपादित केल्याचं दाखवून दुसऱ्याच जागेवर रस्ता आणि पाईपलाईन टाकली. त्यामुळं दोन्ही जागा मागील ५० वर्षांपासून अडकून पडल्याचं सांगत शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना राज्य महामार्गाची एक मार्गीका बंद केली आहे. या बाबत शेतकऱ्यांनी एमआयडीसीला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत प्रश्न न सुटल्यास पूर्ण राज्य महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे. अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाईपलाईनमुळे राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली आहे.

काय आहे प्रकार

हे सुद्धा वाचा

अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोड या राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा एमआयडीसीने १९७२ साली संपादित केली होती. बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची पाईपलाईन आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली.

मात्र कागदोपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर एमआयडीसीनं फेरफाराची नोंद केली त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे ती जागाही गेली, आणि बाजूच्या जागेवर एमआयडीसीची नोंद असल्यामुळे त्या जागेवरही काहीच करता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले. या कागदोपत्री गोंधळाबाबत मागील ५० वर्षांपासून शेतकऱ्यांकडून एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र ही निव्वळ कागदी चूक सुधारण्यासाठी एमआयडीसीने मागील ५० वर्षात स्वारस्य दाखवलं नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी या राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यामुळे केली एक मार्गिका बंद


शेतकरी आक्रमक झाले असतानाही एमआयडीसीकडून कोणतीही हालचाल झाली नाही. यामुळे अखेर मंगळवारी वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली. यानंतर एमआयडीसीला शेतकऱ्यांनी २० दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत जर भूसंपादनाचा तिढा सुटला नाही, तर राज्य महामार्गाच्या दोन्ही मार्गीका बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

अधिकारी म्हणतात, तोडगा काढणार


दरम्यान, शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद केला जात असताना या ठिकाणी एमआयडीसी अधिकारी आणि पोलीसही उपस्थित होते. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारलं असता, आम्ही या प्रश्नाबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं असून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, अशी प्रतिक्रिया उपअभियंता विजय शेलार यांनी दिली.