Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विशेष व्यवस्था, आरती अन् दर्शनाची वेळ जाणून घ्या..

यंदा श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. यानिमित्त प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील पूजा, नैवेद्य आरती आणि दर्शनाच्या वेळा काय असतील, ते सविस्तर जाणून घ्या..

Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विशेष व्यवस्था, आरती अन् दर्शनाची वेळ जाणून घ्या..
Siddhivinayak temple
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 9:23 AM

तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग जुळून आला आहे. मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यानिमित्त मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धीविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता विचारात घेऊन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे 3.15 वाजता महापूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं होईल. हे दर्शन रात्री 11.50 वाजेपर्यंत हे दर्शन सुरू राहील. याशिवाय मंदिर परिसरात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात असतील.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात वैद्यकीय पथक आणि दोन रुग्णवाहिका (त्यापैकी एक कार्डिअॅक रुग्णवाहिका) तैनात असतील. सुरक्षेसाठी अग्निशमन दल आणि अग्निशामक उपकरणंही उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी बेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. भाविकांसाठी मोफत बससेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच मेट्रो 3 च्या (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) सिद्धिविनायक स्थानकामुळे मेट्रोनेही येणं शक्य झालं आहे.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्यास परवानगी नाही. प्रभादेवी इथलं सिद्धिविनायक मंदिर हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. प्रत्येक आठवड्यातील मंगळवारसह संकष्टी चतुर्थीलाही याठिकाणी भाविकांची तुफान गर्दी होते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची ही संख्या दुप्पट-तिपटीने वाढते. हीच बाब विचारात घेऊन मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात सुसज्ज नियोजन केलं आहे.

याआधी 8 ऑगस्ट 2005 रोजी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आला होता. श्रावण मास आणि चातुर्मास अशा उपवासाच्या महिन्यात हा योग आला होता. आता तब्बल 21 वर्षांनंतर 12 ऑगस्ट 2025 रोजी श्रावणातील अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. यादिवशी चंद्रोदय 9 वाजून 17 मिनिटांनी आहे.

अंगारकी चतुर्थीदिनी सिद्धिविनायक मंदिरातील महापूजा आणि नैवेद्य आरती

पहाटे 3.15 वाजता आरती
दुपारी 12.15 वाजता नैवेद्य
संध्याकाळी 7 वाजता धूपआरती (यावेळी दर्शनाची रांग सुरूच राहील)
रात्री 9 वाजता नैवेद्य आणि आरती

दर्शनाच्या वेळांची माहिती

सोमवार (11 ऑगस्ट) मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत दर्शन
मंगळवारी (12 ऑगस्ट) पहाटे 3.50 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन
रात्री 9 ते 9.30 पर्यंत नैवेद्य आणि आरतीदरम्यान दर्शनरांग थांबवण्यात येईल
रात्री 9.30 वाजल्यापासून रात्री 11.50 पर्यंत दर्शन

चंद्रोदय

रात्री 9.17 वाजता