कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना पाणी मारलं, प्रकरण तापलं तर नेत्यांचं फिरणं मुश्किल होईल : अरविंद सावंत

| Updated on: Jan 26, 2021 | 4:00 PM

"केंद्र सरकारने आता अंतर्मुख व्हायलाच हवं. संयमाला सुद्धा मर्यादा असतात", असं अरविंद सावंत म्हणाले (ShivSena on Delhi Tractor Rally).

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना पाणी मारलं, प्रकरण तापलं तर नेत्यांचं फिरणं मुश्किल होईल : अरविंद सावंत
Follow us on

मुंबई : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर संयम राखत शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांधव फुटला आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टर रॅली काढत दिल्ली पोलिसांवर ट्रॅक्टर रॅली चढवण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकरी दिल्लीतील थेट लाल किल्ल्यावर दाखल झाले. तिथे किल्ल्यावरील घुमटावर त्यांनी त्यांचा झेंडा चढवला. या दरम्यान आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. या प्रकरणावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे ते शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना स्पष्ट केली (ShivSena on Delhi Tractor Rally).

“केंद्र सरकारने आता अंतर्मुख व्हायलाच हवं. संयमाला सुद्धा मर्यादा असतात. केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळलं गेलं, त्यांनी शेतकऱ्यांना डांबण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाचं रुपांतर हिंसाचारात होईल असं तुम्ही प्रत्येक वेळी अगोदर कसं सांगू शकता? खरंच शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलंय का? की यामध्ये केंद्र सरकारने दुसऱ्याला घुसवून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे? कारण आंदोलनात अतिरेकी, पाकिस्तानी येतील असं हे आधीच बोलत होते”, असा संशय अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

“केंद्र सरकारने कशी वागणूक दिली याबाबत शेतकऱ्यांच्या मनात चिड होती. अर्थात हिंसेचं समर्थन नाही. पण तुम्हीसुद्धा हिंसा केली. ते एवढ्या कडाक्याच्या थंडीत बसले होते तेव्हा तुम्ही त्यांच्यावर पाणी मारलं होतं. याचं कसलं समर्थन करायचं? अजूनही वेळ गेली नाही. हे प्रकरण तापलं तर केंद्र सरकारमधील नेत्यांना फिरणं देखील मुश्किल होईल. त्यामुळे सरकारने ताबोडतोब या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. ताबोडतोब हे आंदोलन कसं शांत होईल हे पाहिलं गेलं पाहिजे”, असा सल्ला अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारला दिला.

“शेतकरी असं काही करतील, असं मला वाटत नाही. शेतकरी शब्द फिरवतील, असं मला वाटत नाही. तसं नसेल तर काहीतरी घडलं असेल. या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे. वेळीच चांगलं पाऊल उचललं असतं तर निश्चित मार्ग निघाला असता. शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा ठाम पाठिंबा आहे. फक्त हिंसेचं समर्थन आम्ही करणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“आंदोलन सुरु होऊन ६० दिवस झाले. कायदा मागे घेतला असता तर काय झालं असतं? कशासाठी एवढा अहंकार? शेतकऱ्यांना एवढे दिवस थंडीत का ठेवले?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला (ShivSena on Delhi Tractor Rally).

दरम्यान,  शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली. “गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता देशात पसरत आहे. आता आदिवासी शेतकरीही आंदोलनात उतरला आहे. हे आंदोलन एक व्यापक झाले आहे. मात्र केंद्रातले भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना ते महागात पडेल”, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा : Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न