बीडच्या गृहमंत्री कुठे आहेत? चित्रा वाघ यांचा पंकजांवर निशाणा

मुंबई: स्वत:ला बीडच्या गृहमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे कुठे आहेत, असा अप्रत्यक्ष सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला आहे. बीडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे राज्यभरात थरकाप उडाला आहे. नवऱ्यावर भररस्त्यात वार झाले असताना, पीडित […]

बीडच्या गृहमंत्री कुठे आहेत? चित्रा वाघ यांचा पंकजांवर निशाणा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई: स्वत:ला बीडच्या गृहमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे कुठे आहेत, असा अप्रत्यक्ष सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला आहे. बीडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे राज्यभरात थरकाप उडाला आहे. नवऱ्यावर भररस्त्यात वार झाले असताना, पीडित पत्नी मदतीसाठी याचना करत होती, मात्र तिला मदत मिळाली नाही.

या सर्व प्रकारानंतर चित्रा वाघ यांनी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन पंकजा ताईंच्या बीडमध्ये गुंडाराज असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपण बीडपुरत्या गृहमंत्री आहोत असं म्हटलं होतं. त्यावरुन चित्रा वाघ यांनी पंकजांवर निशाणा साधला आहे.

संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!

“बीडच्या घटनेमध्ये कृरतेचा कळस पाहायला मिळाला. पत्नी आपल्या पतीसाठी मदतीची याचना करत होती. सर्वजण व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. याबाबत तीनदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊनही तक्रार घेतली नाही.  कोणत्या तरी राजकीय दबावामुळे ही तक्रार घेतली नसल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहायला मिळत आहेत. मात्र बीडमध्ये तर जंगलराज दिसतंय. भर दिवसा भर रस्त्यात तिथे हत्या होतेय. मुख्यमंत्री अधिवेशनात सांगतात ई मेलने तक्रार करा आम्ही त्याचीही दखल घेऊ, पण इकडे हाडामासाची जिवंत माणसं तक्रारीसाठी गेले पण त्यांची तक्रार घेतली नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये बुधवारी घडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे तरुणाचं नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच सुमितचा वर्गातल्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या भावाला पसंत नव्हता. त्यामुळे मुलीच्या भावाने मित्रांच्या साथीने सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर तिन्ही मारेकरी फरार झाले आहेत. धक्कादायक म्हणजे भररस्त्यात हल्ला केल्यानंतर हा तरुण रक्तबंबाळ स्थितीत पडून होता आणि तरुणी उपस्थितांकडे मदतीची याचना करत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. सर्वजण व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, मी बीडपुरत्या गृहमंत्री

मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता मी बीडपुरती का होईना मी गृहमंत्री आहे, असं म्हटलं होतं. परळी येथील गोपीनाथ गडावरील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडेंनी मुंबई आणि राज्यातील गँगवॉर नष्ट केलं होतं. बीडमध्येही आपण तसंच केल्याचं पंकजा मुंडे त्यावेळी म्हणाल्या होत्या.

संंबंधित बातम्या 

संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!

प्रेमविवाहाला विरोध, मुलीच्या भावाकडून तरुणाची भररस्त्यात ‘सैराट’ स्टाईल हत्या    

‘आधी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आता बीडपुरती गृहमंत्री’, योगायोगाने दोन्ही खाती फडणवीसांची