आता सीएसएमटीहून उरणसाठी लोकल पकडा, दोन महिन्यांपासून मार्ग तयार, उद्घाटनाला होतोय उशीर

| Updated on: Jun 03, 2023 | 6:22 PM

उरण लाईनमुळे गव्हाणपाडा, रांजनपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण या पाच नवीन स्थानकांची भेट मिळेल. मार्च महिन्यात यामार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रवासी ट्रेन चालवून घेतली होती चाचणी..केव्हा होणार उद्घाटन

आता सीएसएमटीहून उरणसाठी लोकल पकडा, दोन महिन्यांपासून मार्ग तयार, उद्घाटनाला होतोय उशीर
uran-kharkopar-local
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पामुळे ( Belapur-Seawood-Uran project ) मुंबईला उरणशी जोडले जाणार असून प्रवासाचे अंतर 40 ते 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. मात्र हा खारकोपर ( Kharkopar ) ते उरण हा दुसरा टप्पा तयार होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मंत्री महोदयांना वेळ नसल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. मध्य रेल्वेचा नेरूळ ( Nerul ) ते खारकोपर पहिला 12.4 कि.मी.चा टप्पा 2018 मध्ये सुरू झाला होता. परंतू खारकोपर ते उरण हा 14.3 कि.मी.च्या दुसर्‍या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले तरी त्याचे उद्घाटन होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेलापूर- सीवूड-उरण 27 किमीच्या रेल्वे प्रकल्पाला मार्च 1996 मध्ये मंजूरी मिळाली होती. परंतू प्रत्यक्षात मार्च 2004 मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांचा अंदाजित प्रकल्प खर्च 495.44 कोटी रुपये इतकी होती. आता या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन 2,900 कोटीपर्यंत पोहचला आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्या 67 : 33 सहभागातून हा प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचा एक तृतीयांश खर्च रेल्वे तर दोन तृतीयांश खर्चाचा वाटा सिडको उचलला आहे.

या स्थानकांची भेट मिळणार

या मार्गावरील 12.4 किमीचा पहिला खारकोपरपर्यंचा टप्पा 11 नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू झाला. त्यावर सध्या दररोज 40 लोकल फेऱ्या सुरू आहेत. या पहिल्या टप्प्यामुळे उलवे परीसरात राहणाऱ्या प्रवाशांचा खूपच फायदा झाला. आता खारकोपर ते उरण 14.60 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर पहील्या टप्प्यात नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर अशी स्थानके सुरू झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात गव्हाणपाडा, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या पाच रेल्वेस्थानकांचा सामावेश होणार आहे.

दुप्पटीने प्रवासी वाढ होणार

पहील्या नेरुळ ते खारकोपर टप्प्यात 40 लोकलच्या फेऱ्या होत असून दिवसाला सरासरी 20 ते 25 हजार प्रवासी याचा लाभ घेत आहेत. दुसरा खारकोपर ते उरण हा टप्पा सुरु झाल्यास ही प्रवासी संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर जेएनपीटीला जाणाऱ्या प्रवाशांना जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गाबरोबर मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ते ट्रान्सहार्बर मार्गाला जोडणारा कळवा ते ऐरोली एलीवेटेड मार्गाचा एक भाग असलेले दिघे स्थानक देखील बांधून पूर्ण झाले आहे. या एलीवेटेड मार्गाचे हे सुरुवातीचे स्थानक ठरणार आहे. त्याचेही उद्घाटन रखडले आहे.