
मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना एकही जागा मिळालेली नाही. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या शशांक राव पॅनलचे अभिनंदन केले.
बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुहास सामंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीत पैशाचा प्रचंड ओघ पाहायला मिळत होता. आम्हाला वाटले की कर्मचारी पैसे स्वीकारतील, पण मतदान आम्हालाच करतील, मात्र पैशाच्या ताकदीपुढे आमची प्रामाणिक मते कमी पडली, असा आरोप सुहास सामंत यांनी केला.
बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आमचा पराभव झाला. पण जे जिंकले त्यांचा अभिनंदन. आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? बारा हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला. प्रचंड पैशाचा ओघ मागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे घेतील, मात्र मतदान आम्हाला करतील. पण पैशाच्या समोर आम्ही कमी पडलो. मी बेस्ट वाचण्यासाठी प्रयत्न केले. भाजपने पैसा लावला. आपल्या अधिकाराचा वापर केला, आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो, असे सुहास सामंत म्हणाले.
मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवे त्यासाठी हे सगळं करतात यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे, असे सुहास सामंत यांनी म्हटले.
दरम्यान बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत हे पॅनेल उभे केले होते, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. बेस्ट पतपेढीच्या २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. तर दुसरीकडे शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकत मोठे यश मिळवले. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या ‘महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेल’ने ७ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटाची गेल्या ९ वर्षांची बेस्ट पतपेढीवरील सत्ता संपुष्टात आली आहे.