
मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. आता या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेला एक मोठा धक्का बसला आहे.
बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीसाठी 18 ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यानंतर 19 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. पण मुंबईतील मुसळधार पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. तर फार चर्चेत नसलेल्या शशांकराव पॅनेलने अनपेक्षित यश मिळवले आहे.
बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत झाली. यात शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना एकही जागा मिळालेली नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाल या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे.
1. आंबेकर मिलिंद शामराव
2. आंब्रे संजय तुकाराम
3. जाधव प्रकाश प्रताप
4. जाधव शिवाजी विठ्ठलराव
5. अम्मुंडकर शशिकांत शांताराम
6. खरमाटे शिवाजी विश्वनाथ
7. भिसे उज्वल मधुकर
8.. धेंडे मधुसूदन विठ्ठल
9. कोरे नितीन गजानन
10. किरात संदीप अशोक
11. डोंगरे भाग्यश्री रतन – महिला राखीव
12. धोंगडे प्रभाकर खंडू – अनुसूचित जाती/ जमाती
13 चांगण किरण रावसाहेब – भटक्या विमुक्त जाती
14 शिंदे दत्तात्रय बाबुराव – इतर मागासवर्गीय
1. रामचंद्र बागवे
2. संतोष बेंद्रे
3. संतोष चतुर
4. राजेंद्र गोरे
5. विजयकुमार कानडे
6. रोहित केणी
7. रोहिणी बाईत – महिला राखीव मतदार संघ
आता या निकालावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजू भौ जवाब दो! बेस्ट पतपेढी निवडणुकीत उबाठा आणि त्यांच्या सहकार्यांचाच दारूण पराभव झाला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. उबाठाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ही निवडणूक EVMवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली. म्हणजे नेहमीप्रमाणे “EVM, मतचोरी, षड्यंत्र” असं खोटं रडगाणं गाण्याचा अधिकार आता संजय राऊतांना नाही. रोज माध्यमांसमोर येऊन लोकशाहीवर डोंगराएवढी भाषणं करणारे संजय राऊत आज मुंबईकरांच्या या लोकशाहीच्या निर्णयावर शिमगा करणार की तोंडात बोटं घालून बसणार? जवाब दो! असा टोला भाजपने लगावला आहे.