जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? सीजेपीने सांगितला ‘प्लान बी’; सरकारला चेकमेट?

कॉकरोच जनता पार्टी (CJP) १० ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहे. कथित निवडणूक घोटाळ्यावरून ही मागणी होत आहे. पोलिसांनी अडवल्यास जिथे रोखतील, तिथेच आंदोलन करण्याचा सीजेपीचा 'प्लॅन बी' तयार आहे.

जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? सीजेपीने सांगितला ‘प्लान बी’; सरकारला चेकमेट?
Abhijit Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 11:37 AM

कॉकरोच जनता पार्टीने मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी देशातील विविध शहरात जाऊन दीपके आंदोलन करणार होते. पण हा प्लान आता बदलण्यात आला आहे. सीजेपीने प्लान बी तयार केला आहे. त्यानुसार येत्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिसांनी जंतरमंतरवर जाऊ दिले नाही तर काय करायचं? याचा प्लान बी दीपकेंकडे रेडी आहे. या प्लाननुसार, पोलीस दिल्लीत जिथे अडवतील, तिथेच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी रोखलं जाईल, ती जागाच जंतरमंतर करण्याचा हा प्लान आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

कथित निवडणूक घोटाळ्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची देशभरात मागणी होत आहे. त्यामुळे सीजेपीने त्यांच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीत जाण्यापूर्वी देशातील विविध शहरांमध्ये आधी आंदोलनं केले जाणार होतं. जनमत तयारे केलं जाणार होतं. त्यामुळेच मुंबईत आंदोलन करण्यात आलं. पण अचानक देशातील इतर शहरात जाण्यापूर्वीच दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीजेपीच्या नॅशनल वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा नवा निर्णय घेण्यात आल्याचं सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी सांगितलं. मात्र, देशातील वेगवेगळ्या शहरात आंदोलन करण्याचा प्लान अचानक का बदलला? याचं उत्तर सीजेपीने दिलेलं नाहीये.

Loading...

10 ऑक्टोबर रोजी दुसरा एल्गार

मुंबईत काल झालेल्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांनी संबोधित केलं. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा नाही दिला तर सीजेपी दिल्लीत जाईल. 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलन करेल. हे आंदोलन शांततेत होईल. महात्मा गांधी यांच्या मार्गानेच आम्ही जाऊ, असं सांगतानाच आम्ही शांतेतत आंदोलन करायचं की नाही हे दिल्ली पोलिसांवर अवलंबून आहे. शांततेत आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे. त्याचा सन्मान करा. 20 जुलैची पुनरावृत्ती करू नका, असं दीपके यांनी म्हटलं होतं.

जंतरमंतरवर जाण्यापासून रोखल्यास?

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्यावेळी सीजेपीने जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याने देशभरात वातावरण तापलं होतं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळेच सीजेपीने जंतरमंतरवर पुन्हा दुसरा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा एल्गार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सीजेपीच्या आधीच्या आंदोलनाचा अनुभव पाहता पोलीस सीजेपीला जंतरमंतरवर जाण्यापासून रोखण्याची शक्यता आहे. अशावेळी काय करायचं? याचा बी प्लान सीजेपीकडे तयार आहे. आम्हाला जंतरमंतरवर जाण्यापासून रोखल्यास जिथे रोखलं जाईल, तिथेच आम्ही दुसरं जंतरमंतर तयार करू, असा इशाराच सीजेपीने दिला आहे. आम्हाला रोखलं जाणार नाही. शांततेत आंदोलन करू दिलं जाईल याची आशा आहे, अशी आशाही सीजेपीने व्यक्त केली आहे.

जंतरमंतर हे असहमतीचं प्रतिक आहे. पण तिथे काही तरी मोठा खजिना आहे आणि लोक त्याच्या शोधात तिथे येत आहेत, अशा पद्धतीने दिल्ली पोलीस रोखत आहेत. आज जंतरमंतर लोकांच्या आशा, साहस, एकजुट आणि विजयाचं प्रतिक बनलं आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर बंद केलं आहे. पण आम्हाला जिथे अडवलं जाईल, तिथेच आम्ही दुसरं जंतरमंतर तयार करू. तिथेच लोक सरकारला सवाल करतील, असं सीजेपीचे सहसंयोजक सौरभ दास यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us