EXCLUSIVE | एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितली आतली बातमी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. असं असताना शरद पवार आज अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

EXCLUSIVE | एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितली आतली बातमी
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' निवासस्थानी जावून भेट घेतली
Chetan Patil | Updated on: Jun 01, 2023 | 8:23 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. असं असताना शरद पवार आज अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी खलबतं काय झाली? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. तसेच मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. या संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“ही सदिच्छा भेट होती. या बैठकीत काही चर्चा झाली नाही. या भेटीत निमंत्रण होतं. याशिवाय काही एक-दोन छोटे विषय होते. यामध्ये शाळांचा विषय होता, कलावंतांचा विषय होता. मुख्य म्हणजे त्यांचं निमंत्रण होतं. अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. बाकी काही नाही”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची पहिल्यांदाच अशी भेट

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची अशी ही पहिल्यांदाच भेट घडून आली आहे. याआधी विविध कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र एकाच मंचावर दिसले होते. पण ते कार्यक्रमांनिमित्ताने तिथे एकत्र आल्याचं दिसलं होतं. त्यामुळे त्या भेटींना फारसं राजकीय महत्त्व दिलं जात नव्हतं. पण आजच्या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us