Covid Update: महाराष्ट्रानं 35 दिवसांनी ओलांडला हजाराचा आकडा, मुंबईची सर्वाधिक भर! काय सांगतेय आकडेवारी?

| Updated on: Dec 23, 2021 | 10:35 AM

गती धीमी असली तरीही महाराष्ट्रातील कोव्हिड रुग्णसंख्येत वाढ होतेय. गंभीर म्हणजे यात मुंबईतील रुग्णांची संख्या जास्त कारणीभूत ठरतेय. बुधवारी गेल्या 35 दिवसात महाराष्ट्राने पहिल्यांदाच हजार रुग्णांचा आकडा पार केलाय.

Covid Update: महाराष्ट्रानं 35 दिवसांनी ओलांडला हजाराचा आकडा, मुंबईची सर्वाधिक भर! काय सांगतेय आकडेवारी?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबईः बुधवारी मुंबईतील कोव्हिड रुग्णसंख्येत (Covid patients) नव्याने वाढ झाली असून यामुळे जवळपास महिनाभरानंतर राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा 1 हजाराच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात काल 1,201 कोव्हिड रुग्ण आढळले असून त्यातील मुंबईतील रुग्ण (Mumbai Corona) 480 च्या घरात आहेत. मागील 68 दिवसांतील मुंबईतील रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. याआधी म्हणजेच, मंगळवारी राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा 825 एवढा होता. 35 दिवसांपूर्वी 17 नोव्हेंबर रोजी राज्याने एक हजाराचा आकडा ओलांडला होता. तेव्हा 1,003 एवढी रुग्णसंख्या आढळून आली होती.

रुग्णांत वाढ मात्र, मृत्यूचा आकडा कमी!

मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास पाच दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या 9 टक्क्यांनी वाढली. हा आकडा 7,093 पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या 6,481 एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.

मुंबईतील कोव्हिडची स्थिती काय?

मागील तीन दिवसात माहीममधील कोव्हिड रुग्णांची संख्या 14 पर्यंत पोहोचली. यापूर्वीच्या दोन-तीन आठवड्यात ती 0 ते 1 एवढीच नोंदली जात होती. माहीम मेळा आणि चर्चमधील वाढती संख्या या दोन कारणांमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली असावी, असा अंदाज मुंबई महापालिकेने वर्तवला आहे. राज्याने दिलेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांचा आकडा मुंबईतील रुग्णांमुळे दिसत असून, शहरातील दैनंदिन तपासण्यांचा अहवालही वाढता दिसून येत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरीही मागील आठवड्याच्या तुलनेत लसीकरण मात्र कमी झालेले दिसून आले आहे. 15 ते 21 डिसेंबरदरम्यान राज्यातील दैनंदिन लसीकरण 24 टक्क्यांपर्यंत घसरले असून हा आकडा 5 लाख 34 हजारांपर्यंत गेला आहे.

इतर बातम्या

बचत गटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला सुरुवात

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर