
मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येरवडा तुरुंग परिसरातील भूखंडावरून राजकीय नेत्यांवर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एक नवा गौप्यस्फोट केला आहे. मीरा बोरवणकर यांनी दाऊदला मारण्याच्या प्लॅनवर सविस्तर भाष्य केलं आहे. ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात त्यांनी हे धक्कादायक खुलासे केले आहेत. दाऊदला पकडण्याचा केंद्रीय एजन्सीचा प्लान होता. पण केंद्रीय एजन्सी आणि मुंबई पोलिसांतील समन्वयामुळे या प्लानचं काय झालं? यावर त्यांनी या पुस्तकात भाष्य केलं आहे. त्यातील भाष्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मीरा बोरवणकर यांच्या नेतृत्वातील टीमने विक्की मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांना अटक केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. विक्की मल्होत्रा आणि फरीद तनाशा मुंबईतील लोकांकडून जबरदस्ती वसूली करत होते. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी आम्ही ऑपरेशन हाती घेतलं होतं. मुंबई क्राईम ब्रँचला डोभाल यांच्या कोणत्याही योजनेची माहिती नव्हती, असं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे. तसेच ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकातही मीरा बोरवणकर यांनी या प्रकरणावर दृष्टीक्षेप टाकला आहे.
दरम्यान 2005मध्ये एक बातमी आली होती. दाऊदची मुलगी महारुखचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचा मुलगा जुनैदशी होणार होती. भारतीय गुप्तचर विभागाला दाऊदच्या मुलीच्या लग्नाची माहिती मिळताच दाऊदचा दुबईतच खात्मा करण्याचा प्लान तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी एजन्सींनी छोटा राजनच्या लोकांना कामाला लावले. अजित डोभाला या ऑपरेशनचं नेतृत्व करत होते. तर ही मोहीम फत्ते करण्यासाठी छोटा राजनने त्याचे निकटे शार्पशूटर विक्की मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांना कामाला लावलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे छोटा राजनच्या साथीदारांच्या मदतीने दाऊदला मारण्याचा प्लान तयार केलेला असताना त्याच शार्पशुटरला इतर गुन्ह्यात अटक करण्याचा मुंबई पोलिसांनी प्लान तयार केला होता. विक्की मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांना अटक करण्याच्या प्लानचं नेतृत्व मीरा बोरणवकर यांनी केलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसांतील काही लोकांचं दाऊदशी साटंलोटं असल्याचं सांगितलं जात होतं.
मीरा बोरवणकर यांनी या सर्व गोष्टीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केलं आहे. आम्ही गुन्हेगारांचे फोनन इंटरसेप्ट करत असतो. 2005मध्येही तेच झालं होतं. त्यावेळी मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांकडून गुंडांची खंडणी वसुली सुरू होती. त्यावेळी वातावरण चांगलं नव्हतं. आम्ही कॉल इंटरसेप्ट करत होतो. या ऑपरेशनला प्रोजेक्ट एक्स म्हटलं गेलं.
आम्ही कॉल इंटरसेप्ट केले आणि विक्की मल्होत्राचा पत्ता लागला. तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. तो संबंधित व्यक्तीला सर म्हणत होता. तर तो ज्याच्याशी बोलत होता, त्या सरचा आवाज वेगळा होता. हा सर कोण आहे हे आमच्या विभागातील कोणीच ओळखू शकलं नाही. आमची टीम विक्की आणि फरीदला अटक करण्यासाठी आधी कोलकाता आणि नंतर दिल्लीला गेली, असं मीरा बोरवणकर यांनी म्हटलंय.
इन्स्पेक्ट पाटील दिल्लीत होते. ते माझ्याकडे आदेश घेत होते. कारण डीसीपी धनंजय कमलाकर यांची फ्लाईट मिस झाली होती. इन्स्पेक्टर पाटील यांना विक्की मल्होत्रा आणि अन्य एकाच्या समोर जावं लागलं. आपण आयबीचे माजी संयुक्त संचालक असल्याचं त्या व्यक्तीने साांगितलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि बातमी मीडियात फुटली, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.
त्या आयबीच्या अधिकाऱ्याने आपण त्या ऑपरेशनमध्ये असल्याचं म्हटलेलं नाही. त्याने फक्त मला विक्कीला सोडायला सांगितलं. नंतर दिल्ली पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. त्या दरम्यान सर्वजण दिल्ली पोलीस ठाण्यात गेले. पाटील हे फरीदला अटक करण्यासाठी गेले. मी राज्यातील वरिष्ठ आयबी अधिकाऱ्यांना फोनही केला. तुम्हाला दाऊदशी संबंधित कोणत्या ऑपरेशनची माहिती आहे का असं विचारलं. त्यांनाही या ऑपरेशनची माहिती नव्हती. असं कोणतंच ऑपरेशन सुरू नसल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला विक्की आणि फरीदला अटक करायची होती. हे मुंबई क्राईम ब्रँचचं प्रोफेशनल ऑपरेशन होतं.
विक्की मल्होत्रा आणि फरीद तनाशा याला अटक करण्यात आली. त्यामुळे डोभाल यांचं ऑपरेशन फेल गेलं. यावर मीरा बोरवणकर यांनी भाष्य केलं. केवळ समन्वयचा अभाव होता. डोभाल हे निवृत्तीनंतर एजन्सीसाठी काम करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना नव्हती. मात्र, मुंबई पोलीस दाऊदसाठी काम करत होती, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असंही त्या म्हणाल्या.
या घटनेनंतर तुला धडा शिकवेन असं अजित डोभाल म्हणाले होते, असंही त्यांनी सांगितलं. मी विक्कीला सोडण्यास नकार दिला. तसेच इन्स्पेक्टर पाटील यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश दिले. त्यावेळी डोभाल यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी मी तुला धडा शिकवेल असं म्हटलं, असं त्या म्हणाल्या. तसेच मला माझी शिक्षा मिळाली. पण मी त्यावर विस्ताराने बोलणार नाही, असं त्या म्हणाल्या.