मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाताना अति वेगामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एका भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात लाला कॉलेजसमोर, लोटस जेटीजवळ घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या BMW कारचा हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाने नियंत्रण गमावल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीन जणांना मृत जाहीर करण्यात आले. मृत झालेल्यांमध्ये शानय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि एक २५ वर्षीय अनोळखी तरुण यांचा समावेश आहे. चौथ्या २० वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलिसांची धाव
अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला आणि पुढील तपास सुरू केला. कारचा ताबा घेण्यात आला असून ती तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि कारचा वेग किती होता, याबाबत अधिक माहिती तपासाअंती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
कोस्टल रोड हा मुंबईतील आधुनिक आणि आकर्षक रस्ता असला तरी रात्री-पहाटे येथे अतिवेगाने गाड्या चालवल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. यापूर्वीही येथे वेगामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
नायर रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम
नायर रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. २५ वर्षीय अनोळखी तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत. गंभीर जखमी तरुणावर डॉक्टरांचे लक्ष आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे. या दुर्घटनेने तीन तरुणांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.