समुद्राच्या पोटातून सुसाट धावणार बुलेट ट्रेन! 21 किमीचा बोगदा नेमका कुठून कुठपर्यंत असणार?

| Updated on: Sep 24, 2022 | 1:26 PM

Mumbai Ahmadabad Bullet Train Undersea Tunnel : समुद्र सपाटीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल बोगदा तयार करण्याचा विचार केला जातो आहे. त्यासाठी शिळफाटा येथील पारसिक हिल येथे समुद्रसपाटीपासून 114 मीटर खाली बोगद्याचं काम केलं जाईल.

समुद्राच्या पोटातून सुसाट धावणार बुलेट ट्रेन! 21 किमीचा बोगदा नेमका कुठून कुठपर्यंत असणार?
कसा असेल समुद्राखालील बोगदा?
Follow us on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट (Mumbai-Ahmedabad Bullet Train) ट्रेन ही समुद्राच्या पोटातून धावणार आहे. समुद्राखाली एक बोगदा तयार केला जाणार असल्याची माहिती समोर आलीय. या बोगद्याच्या निर्मितीसाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. बीकेसी ते ठाणेदरम्यान (BKC to Thane), 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधला जाईल. हा मार्ग समुद्राच्या खालून तयार केला जाणार आहे. त्यासाठी देशात पहिल्यांदाच समुद्राखालून बोगदा (Undersea Tunnel) तयार केला जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 21 किलोमीटरचा एक बोगदा तयार केला जाणार आहे. त्यातील 7 किलोमीटरचा मार्ग हा ‘अंडरसी टनल’चा म्हणजेच समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा असेल, अशी माहिती मिळतेय. वांद्रे कुर्ला कॉम्पेलक्स ते शिळफाटा या मार्गावर हा बोगदा तयार होणार आहे.

दरम्यान याआधी दिल्ली-मुंबई रॅपिड रेल ट्रान्झिट प्रकल्पासाठीही पाण्याखालून बोगदा तयार करण्याचा विचार केला जात होता. पण नंतर तो प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. काही तांत्रिक कारणामुळे पाण्याखालून बोगदा करणं व्यवहार्य नसल्यानं लक्षात आल्यानं रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा ताज्या घडामोडी : Video

समुद्र सपाटीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल बोगदा तयार करण्याचा विचार केला जातो आहे. त्यासाठी शिळफाटा येथील पारसिक हिल येथे समुद्रसपाटीपासून 114 मीटर खाली बोगद्याचं काम केलं जाईल. 13.1 मीटर व्यासाच्या कटर हेड मशिनच्या मदतीने हा बोगदा तयार करावा लागणार असल्याचंही सांगितलं जातंय.

देशातील हा पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जानेवारी 29 पर्यंत या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्यात. 2026 सालापर्यंत बुलेट ट्रेनचा 50 किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दीष्ट रेल्वे मंत्रालयानं ठेवलं आहे. समुद्राखालून साकारला जाणारा हा बोगदा इंजिनिअरींगचा एक उत्तम नमुदा ठरु शकतो, असं सांगितलं जातंय. मात्र हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागणार आहे. नेमकं समुद्राखालून तयार केल्या जाणाऱ्या या बोगद्याचं काम कुणाला दिलं जातं, हे येत्या वर्षात स्पष्ट होईल.