‘सारथी’ला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

सारथीला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Uddhav Thackeray
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 11:35 AM

गुरुवारी (26 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सारथी (Sarathi) संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्य शासनाने मराठी, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली. या संस्थेला खारघर सेक्टर 37 मधील तीन हजार 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर आणि मुंबई इथं विभागीय कार्यालय, वसतीगृहे, अभ्यासिका, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचं आणि 500 मुलींचं स्वतंत्र निवासी वसतिगृहदेखील विकसित करण्यात येईल. याअंतर्गत नवी मुंबई इथल्या केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरत रहा असं आवाहनही केलंय. राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के इतकी वाढ झाली आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे 18.52 टक्के आणि 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.