
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : महाविकास आघाडीची मुंबईत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतं महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना निमंत्रण होतं. त्यानुसार अनेक आमदार या बैठकीला हजर होते. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती बैठकीनंतर आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपली मोठी शक्ती, जे सोडून गेले त्यांची चिंता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 16 ऑगस्टरपासून महाराष्ट्र दौरा करतील आपणही त्यात धरतीवरती दौरा करायचा आहे, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
येत्या 15 ऑगस्टनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
“तीनही पक्षांनी एकत्र फिरायचं, एकत्र लढायचं, एकत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायचं, एकत्र राहायचं, एकत्र वज्रमूठ सभा घ्यायच्या, अशी चर्चा झाली. या सरकारने खोटा प्रचार करुन लोकांना फसवलं आहे त्याचा पर्दाफाश करायचा, असंही या बैठकीत ठरलं आहे”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
“महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत”, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे. “राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही तीनही मित्रपक्ष एकत्र आहोत. आम्ही तीनही मित्रपक्ष एकत्र लढणार आहोत. जनमानस आमच्याबरोबर आहे. आम्ही आता काही काळाने विभागवार बैठका सुरु करु. लवकरच वज्रमूठच्या सभादेखील सुरु होतील”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “आमच्या सरकारकडून योग्य उत्तराची अपेक्षा आहे. पण त्यांच्याकडून जसं उत्तर अभिप्रेत आहे ते टाळत आहेत”, असंही थोरात म्हणाले.
“वज्रमूठ सभा घ्यायच्या आहेत. पण पावसानंतर सभा सुरु होतील. आपण आमचं दोन आठवड्याचं कामकाज पाहिलं आहे. आजचंही कामकाज पाहिलं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समर्थपणे लढतोय, असं जनतेमध्ये सुद्धा वाटतंय. कोणतीच अडचण नाही. आमच्या आमदारांची संख्या कमी झाली असेल पण स्पिरीट कमी झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाविकास आघाडीचे आमदार नसीम खान यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. सरकार शेतकरी, नागरीक, विकासाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष करत आहे, भेदभाव करत आहे, निधी देत नाही आहे. भाजपनं लोकशाहीची हत्या केली आहे. त्याविरोधात मविआचे नेते येणाऱ्या ४-५ महिन्यात जिल्हानिहाय दौरे करतील”, अशी माहिती नसीम खान यांनी दिली.