मोठी बातमी ! महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Oct 13, 2021 | 5:17 PM

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. 

मोठी बातमी ! महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेती आणि पिकांचं नुकसान बघून अनेक शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही विनंती राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे.

एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

राज्य सरकारच्या मदतीचं स्वरुप नेमकं कसं असेल?

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल

शेतकरी मदतीवरुन विरोधकांचा ठाकरे सरकारवर वार

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. पण जवळपास दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असं म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता. शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरलं होतं. दुसरीकडे राज्य सरकारकडून पंचनाम्याचं कारण दिलं जात होतं.

“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे राजू शेट्टी म्हणाले होते. तसेच लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे राजू शेट्टी म्हणाले होते.

राजू शेट्टींना अजित पवारांचं उत्तर

शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही असे राजू शेट्टी म्हणालेत.यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी महाराष्ट्रातलं साखर कारखान्यांचं गणित सांगितलं. मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर 10 किलोला टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना 500 ते 600 रुपये टनाला जास्त भाव मिळतो, साखरेचं पोत तयार झाले की 1 रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतक-यांच्याच पैशातून दिलं जातं. 15 तारखेला कारखाने सुरु होतायत, दहा कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज दहा लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्याचंया पध्दतीने सागंतायत त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं, वेदना किती खोल हेही दिसतं; पवारांचे फडणवीसांना खोचक टोले

व्हिडीओ बघा : राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार