Devendra Fadnavis : इतिहासातून शिकायचं असतं, जो समाज आपला इतिहास विसरतो, त्यांना..26/11 च्या आदरांजली कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे शब्द
Devendra Fadnavis : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षात मुंबईत किंवा देशात दहशतवादी घटना पूर्णपणे संपलेल्या आहेत. काही प्रयत्न झाले तरी ते देखील उखडून टाकण्यात आले" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26/11 हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देताना बोलले.

मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला होता. आज या हल्ल्याचा स्मृतीदिन आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तिथे त्यांनी शहीदांच्या आठवणींना उजाळा दिला. “त्यांनी जाणीवपूर्वक अशा जागा निवडलेल्या जिथे जास्तीत जास्त नुकसान होईल, जास्तीत जास्त लोक मृत्यूमुखी पडतील. ताज, ट्रायडंट सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिप्लोमॅट्स असतात. वेगवेगळ्या देशाचे नागरिक त्या ठिकाणी असतात. अशा ठिकाणी हल्ला करुन संपूर्ण जगभरात भारतावर आम्ही हल्ला केला हा संदेश त्यांना द्यायचा होता” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई 26/11 हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देताना बोलले. गेट वे ऑफ इंडिया इथे ते बोलत होते.
“आपल्या जाबाज जवानांनी त्यांचा मुकाबला केला. करकरे साहेब, कामटे साहेब, साळसकर साहेब लढले. तुकाराम ओंबळेजींनी ओळखलं हा कसाब आतंकवादी आहे. त्याच्याकडे बंदुक होती, यांच्याकडे फक्त दांडुका होता. पण तरीदेखील तुकाराम ओंबळे यांनी शरीरामध्ये गोळ्या गेल्या तरी त्याची चिंता केली नाही. त्या कसाबला धरलं, कसाब पकडला गेला म्हणून संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा चेहरा, बुरखा आपण फाडला. जगाने हे मान्य केलं हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई थांबली नाही, मुंबई कधीही थांबत नाही
“हा दिवस आपण विसरु शकत नाही. हा दिवस विसरायचा देखील नाही. हा संविधानावर झालेला हल्ला आहे. यापुढे कधीही असा हल्ला होऊ द्यायचा नाहीय. म्हणून एकीकडे शहीदांना श्रद्धांजली, आदरांजली अर्पित करतोय. आम्ही सगळे दहशतवादाविरुद्ध एक आहोत. मुंबई थांबली नाही, मुंबई कधीही थांबत नाही. कितीही प्रयत्न केला, तरी आमचा निर्धार कोणताही दहशतवादी थांबवू शकत नाही हे मुंबई, महाराष्ट्राने दाखवनू दिलय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भविष्याचा वेध घेऊन त्यातून बोध घेतो
“पहलगामची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. पण त्यानंतर भारताने जे आपलं रौद्ररुप दाखवून दिलं. माननीय पंतप्रधान महोदयाच्या नेतृत्वात उरी, पेहलगाम ज्या-ज्या ठिकाणी भारताचे जवान आणि नागरिकांवर हल्ला होईल, ते भारत सहन करणार नाही. भारत पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला करेल. अशा हल्ल्यांचा बदला घेईल. हे आपण त्या ठिकाणी दाखवून दिलं” असं मुख्यमंत्री म्हणाले. “इतिहासातून शिकायचं असतं, भविष्याचा वेध घ्यायचा असतो. जे समाज आपला इतिहास विसरतात, त्यांना वर्तमान असतं. पण भविष्य नसतं. म्हणून हा कार्यक्रम महत्वाचा आहे. ज्यातून घडलेली घटना आपण लक्षात ठेवतो, आपल्या शहीदांना नमन करतो आणि भविष्याचा वेध घेऊन त्यातून बोध घेतो” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.