अरे बाबा आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना? राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत हल्लाबोल
अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी टीकाकारांना भूतकाळाची आठवण करून दिल्यावर, संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत हल्ला चढवत, त्यांना वर्तमान परिस्थिती आणि सरकारच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला सुरू केला आहे. राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या काळात उद्योगपतीही सुरक्षित नव्हते. यांच्याच काळात मनसुख हिरेन प्रकरण घडले. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी स्वत:ला आरशात पाहावे, असा हल्ला फडणवीस यांनी चढवला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांच्या संतापाचा पारा इतका चढला की त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली. अरे बाबा आता तू मुख्यमंत्री आहेस ना? मागचं काय सांगतो? हे दुर्देवाने म्हणावसं वाटतं. 50 वर्षापूर्वी अमूक झालं… 60 वर्षापूर्वी तमूक झालं… मनसुख हिरेन प्रकरणात आरोपी आत आहेत. आताचं बोला. कालचं बोला. काय बोलावं या मुख्यमंत्र्यांना? त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं का? मला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. कुठलं काय काढतात? तुमच्या राज्यात रोज खून होत आहेत. यांचा गजनी झालाय. यांना कालचं काही आठवत नाही. म्हणून रिजीम चेंज हवा आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
पाच वर्ष तुम्ही काय करत आहात?
यांना सकाळचं आठवत नाही. यांच्या मेंदूला बधिरता आली आहे. त्यांच्या काळात हे झालं, त्यांच्या काळात ते झालं… तो काळ गेला रे. मोदी अजून नेहरू काळात अडकले आहेत. अमित शाह राजीव गांधींच्या काळात बसले आहेत. तुम्ही 12 वर्ष काय करत आहात? घासत बसला का? दुसरा शब्द वापरणार नाही. पाच वर्ष काय करत आहात तुम्ही? कुणाचं राज्य आहे? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना? ज्ञानेश कुमारने निवडून दिलं ना? ज्ञानूचं हे सरकार आहे. जनतेचं सरकार नाही. रोज गोळीबार होत आहे. तुमच्या अपयशावर बोला. तुमची सत्ता आहे. तुम्ही तिरंगा फडकवू देत नाही. एवढी तुमची हातभर फाटली आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
आमच्या हातात सत्ता येऊ द्या
उद्धव ठाकरेंना त्यांचे आमदार सुरक्षित ठेवता आले नाहीत. ते रिजीम चेंजच्या गोष्टी करत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्या आमचं सरकार येऊ द्या. मग कळेल तुमचे खासदार आणि आमदार किती राहतात. शेवटी सत्ताच सर्व काही करते. आमच्या हातात सत्ता आल्यावर फडणवीसही पक्ष बदलतील. अमित शाहही पक्ष बदलतील. अमित शाहांचा मुलगाही पक्ष बदलेल, असंही ते म्हणाले.
