जवाब दो, जवाब दो…; मराठा आंदोलक देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर धडकणार, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली ती कशासाठी झाली, याबद्दलचा खुलासा करावा", असेही रमेश केरे पाटील म्हणाले.

जवाब दो, जवाब दो...; मराठा आंदोलक देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर धडकणार, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
| Updated on: Aug 06, 2024 | 10:09 AM

Maratha Kranti Thok Morcha Protest : गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन विविध आंदोलन सुरु आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत जबाब दो आंदोलन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केले जाणार आहे. सध्या रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत.

पोलीस बंदोबस्त तैनात

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” या नाऱ्याखाली आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होत असल्याने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेट्स टाकायला सुरुवात केली आहे.

मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही, तर

मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आंदोलनापूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी “आम्हाला मुंबई पोलिसांनी अडवलं तर आम्ही ठिय्या मांडू, असे रमेश केरे पाटील यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांना मराठवाड्याची परिस्थिती माहिती नाही. मराठा आरक्षणासाठी कुठेतरी राजकारण होत आहे. येणाऱ्या काळात मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही, तर योग्य असं उत्तर दिलं जाईल. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली ती कशासाठी झाली, याबद्दलचा खुलासा करावा”, असेही रमेश केरे पाटील म्हणाले.

आमचा उद्रेक बघू नका

“शरद पवार यांनी मंडळ आयोग आणले. मात्र आता समाजासाठी हे नेते का एकत्र येत नाही. मराठा समाज हा आर्थिक दुर्बल असा आहे. त्यामुळे आम्हाला शैक्षणिक आणि इतर आरक्षण टिकणारे पाहिजे. मराठा आरक्षण प्रश्न सरकारने आणि इतर नेते मंडळींनी लवकरात लवकर मार्गी लावावा. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. बांगलादेशमध्ये काय झाले, हे बघत आहात. त्यामुळे आमचा उद्रेक बघू नका”, असा इशाराही रमेश केरे पाटील यांनी दिला.

यापूर्वी रमेश केरे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन केले होते. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही. हा अधिकार केंद्राचा आहे. याची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे. मी माझे खासदार द्यायला तयार आहे. सर्वांनी मिळून केंद्राकडे जाऊया… मोदींकडे जाऊया… जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे.” असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना दिले होते.