
येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दलची घोषणा केली असून त्यांनी नुकतंच याबद्दल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईत येण्याचा मार्ग, मराठा समाजाच्या मागण्या यासोबतच विविध विषयांवर भाष्य केले आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठा विरोध दर्शवला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. एवढंच नव्हे तर ते स्वतः तक्रार करण्यासाठी आझाद मैदान येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये. त्यांचे आंदोलन रोखून धरा, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे.
त्यासोबतच भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांना माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा असं म्हणत एक प्रकारे धमकावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी आपल्याला आया-बहिणींचा सन्मान कसा करावा हे शिकवले. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करताय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.
ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की तुमची नौटंकी सुरू होते, असा गंभीर आरोपही प्रसाद लाड यांनी केला.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटम दिलं. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यासोबत मनोज जरांगेंनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असेही ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे.