सरकारला दोन दिवसांचा वेळ, नाहीतर…. मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग ठरला
जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या तर त्या आम्हाला पाहिजेत, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक दिली आहे. आता नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी त्यांचा मुंबईत जाण्याचा मार्ग कसा असेल, त्यांच्या मागण्या काय, याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यासोबत मनोज जरांगेंनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असेही ठामपणे सांगितले आहे.
मनोज जरांगेंनी सांगितला मार्ग
येत्या २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता मुंबईकडे निघणार आहोत. अंतरवालीहून मंकाळा, शहागड, शहागड चौक, आंबळटाकळी, तुळजापूर, वाघाडी, पैठणहून आपण मुंबईकडे जाऊ. त्यानंतर २७ ऑगस्टला शिवनेरी मुक्कामी असणार आहोत. यानंतर २८ ऑगस्टला शिवनेरीचे दर्शन घेऊन राजगुरु खेडमार्गे चाकणला जाऊन तळेगाव लोणावळा पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदानात जाऊ. २८ ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानात पोहोचू. त्यानंतर २९ ऑगस्टला आपले बेमुदत उपोषण सुरु होईल, असे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुलांचे हाल होता कामा नये. याच मार्गाने जावं हा आमचा हट्ट नाही. मुंबईत हजारो रस्ते आहेत. त्यातला कोणताही मार्ग द्या. आम्हाला न्यायासाठी जायचं. कोणलाही त्रास व्हावा हे आम्हाला जायचं नाही. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जाणार नाहीत. आपण चाकण मार्गे जातोय, हा आपला फायनल मार्ग असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मागण्या काय?
मराठा आणि कुणबी हा जीआर आम्हाला मंजुरीसह पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हे सरकारने लक्ष देणं गरजेचे आहे. त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू केलं पाहिजे. त्यावर अभ्यास चालला हे ऐकून घेणार नाही. तुम्ही कारण सांगितलेली ही ऐकून घेणार नाही. गेल्या १३ महिन्यांपासून गॅझेटच सुरु आहे. तरी जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या तर त्या आम्हाला पाहिजेत, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
