
मुंबईतील दादरच्या कबुतरखाना परिसरातील कबुतरखाना बंद करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आज आंदोलन केले. जैन मुनींनी कबुतरखान्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा वापरल्यानंतर मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे हा वाद चिघळला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कबुतरखाना बंदीचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे, असे सांगितले. तसेच या विषयाला जातीयवादाचा रंग देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. आता यावर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
जैन समाजाच्या आंदोलनावेळी कोणतीही कारवाई झाली नाही, पण मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांवर धरपकड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं दुर्दैव हेच आहे की आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाहीत. त्यांच्यासोबत लोढासारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आहेत. आमच्याकडे एकही आमदार किंवा मंत्री या बाजूने उभं राहणारा नाही. हे आमचं दुर्दैव आहे, असे गोवर्धन देशमुख म्हणाले.
“कबुतरखाना परिसरात जे काही आंदोलन झाले, त्यावेळी चाकू सुरे आणून जो काही हल्ला करण्यात आला. महापालिकेने जे काही बांबू आणले होते, ते तोडले. त्यानंतर पुन्हा कायद्याला आवाहन केलं की आम्ही कायद्याला जुमानत नाही आम्ही मोर्चे काढू, शस्त्र काढू, त्यावेळी हे पोलीस कुठे होते. पोलिसांनी या आठ दिवसात काय कारवाई केली, हे विचारायला आम्ही या ठिकाणी संयमाने शांततेने आलो. पण पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाही वापरली आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. आमच्यासोबत गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री हे एका विशिष्ट समाजासोबत उभे आहेत. असा प्रत्यय पुन्हा एकदा आम्हाला आलेला आहे. आम्ही पोलिसांना विनंती केली होती की आम्हाला माध्यमांशी बोलू द्या, आम्हाला उपायुक्तांना निवेदन देऊ द्या आणि कायदा सुव्यवस्थेची भाषा बिघडेल हे सांगणाऱ्यांना आवरावं हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्ही निवेदन देण्यासाठी जमलेलो असताना पोलिसांनी धरपकड केली”, असे गोवर्धन देशमुखांनी म्हटले.
“माझा हात मुरळगला आहे. माझ्या हाताला इजा झाली आहे. मी इथे पोलिसांसाठी आलो होतो आणि माझं रक्त कोणी काढलं, आपल्या आत एक मराठी माणूस लपला आहे. पण जर कोणी दादागिरी करत असेल तर त्याच्यासमोर उभ राहणं एक नागरिक म्हणून एक चळवळ म्हणून आमची भूमिका आम्ही मांडत आहे. पण ही दडपशाही आम्हाला मान्य नाही. आम्ही याचा निषेध करतो. आमचं दुर्दैव हेच आहे की आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाहीत. त्यांच्यासोबत लोढासारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आहेत. आमच्याकडे एकही आमदार किंवा मंत्री या बाजूने उभं राहणारा नाही. हे आमचं दुर्दैव आहे”, असे गोवर्धन देशमुख म्हणाले.
“सध्या धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. आम्ही रस्ता अडवू शकतो, आम्ही पोलिसांना धक्काबुक्की करु शकतो. आम्ही न्यायालयाला जुमानू शकत नाही. ही ताकद निवडणुकीसाठी दाखवत आहेत. यांच्या बाजूने उभं राहणारे मंत्री आहेत. हे राज्य कायद्याने चालणारे राज्य आहे. राज्य घटनेनुसार चालणारे राज्य आहे. इथे न्यायालयीन व्यवस्था सर्वोच्च स्थानी मानणारी व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा सन्मान राखायला हवा. तुम्ही त्याच्या विरोधात जर कोणतीही कृती करत असाल तर आम्ही देखील तुमच्या समोर उभे राहू”, असेही गोवर्धन देशमुखांनी सांगितले.