
नंदकिशोर गावंडे, Tv9 मराठी, मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : मुंबईत स्वत:चं घर घेऊ इच्छित नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाने काही दिवसांपूर्वी 4082 घरांसाठी सोडत काढली होती. म्हाडाने याबाबतची घोषणा केल्यानंतर लाखो मुंबईकरांनी आपलं नशिब आजमावलं होतं. या 4082 घरांसाठी तब्बल 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. खरंतर अर्जदार त्यापेक्षा जास्त होते. पण काही अर्ज नियमानुसार, त्रुटींमुळे अपात्र ठरले होते. म्हाडाने अर्जदारांची अंतिम तारीख काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली होती. त्यानंतर आता या सर्व अर्जदारांसाठी अतिशय गुड न्यूज आहे. कारण या सर्व 4082 घरांच्या लॉटरीची तारीख अखेर ठरली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महामंडळाच्या लॉटरीची तारीख ठरली आहे. 14 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता मुंबई महामंडळाची लॉटरी निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर तारीख निश्चित झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे आणि म्हाडा अधिकारांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. 4082 घरासाठी जवळपास 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. या सर्वांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या 4082 घरामंध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे ही पहाडी गोरेगाव येथे असणार आहेत. या घरांसाठी तब्बल 22 हजार 472 नागरिकांनी अर्ज दाखल केलाय.
उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटात 843 घरे आहेत. या घरांसाठी 28 हजार 862 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या गटातील सर्वाधिक अर्ज हे कन्नमवार नगर विक्रोळीसाठी प्राप्त झाले आहेत. इथे 415 घरे आहेत.
अल्प अत्पन्न गटासाठी 1034 घरे आहेत. या घरांसाठी 60 हजार 522 नागरिकांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गटासाठी पहाडी गोरेगाव या भागासाठी सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पहाडी गोरेगाव येथे 416 घरे आहेत.
दरम्यान, मध्यम उत्पन्न गटातील 138 घरांसाठी 8395 जणांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज उन्नत नगर गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी करण्यात आले आहेत. तर उच्च उत्पन्न गटातील 120 घरांसाठी 2068 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरता असल्याची माहिती आहे.