
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक परिसरात शंटिंग ड्युटी करताना रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक बसल्याने मोटरमनचा मृत्यू झाला. दिलीप कुमार साहू असं त्यांचं नाव आहे. दिलीप साहू हे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास विरार रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ते शंटिंगचं काम करत होते. विरार-डहाणू लोकलचा एक रेक ते फलाट क्रमांक ४ ए वर आणत होते. त्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास ते रेल्वे रूळ ओलांडताना गाडी क्रमांक 12903 गोल्डन टेम्पल मेलची धडक त्यांना लागली आणि त्यात त्यांच्या मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस पोहोचले. तसंच मोटरमनचा मृत्यू झाल्याची माहिती लोको पायलट आणि स्थानक व्यवस्थापकांनी पश्चिम रेल्वेच्या संबंधित विभागाला दिली. मोटरमन दिलीप साहू कर्तव्यावर असताना जखमी होऊन मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मदत म्हणून 30 हजार रुपये आणि तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपये कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. गट विमा योजनेचे 60 हजार रुपये, सद्भावना निधी म्हणून 25 लाख रुपये आणि इतर देणी देण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी शनिवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक पुढील 30 दिवसांचा म्हणजेच 18 जानेवारी 2026 पर्यंत असेल. या ब्लॉकमुळे शेकडो लोकल फेऱ्या रद्द होतील. इतर लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. नाताळपर्यंत दररोज सुमारे 100 लोकल रद्द होतील. पश्चिम रेल्वेवरील बोरिवलीपर्यंतचं सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान रुळ बदळणं, नवीन रुळ जोडणं, अनेक क्रॉसओव्हर बसवणं आणि काढणं ही कामं केली जातील. अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची मोठी कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही उपनगरीय, प्रवासी आणि मेल/एक्स्प्रेसवर परिणाम होईल.
सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररात्री 11 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सोमवार ते गुरुवारपर्यंत दररोज अप 47 आणि डाऊन 47 अशा एकूण 94 लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील.