मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने

Mumbai BJP : मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
Mumbai BJP Clash
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 9:36 PM

मुंबई महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत बैठकीत दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, हा वाद अमित साटम यांच्या समोरच झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई महापालिकेतील पक्षाच्या कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित साटम यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ शाब्दिक खडाजंगी झाल्यानंतर अमित साटम यांनी हस्तक्षेप करत दोघींनाही समज दिल्याचे बोलले जात आहे.

‘एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा’

मुंबई महापालिकेत पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये स्पर्धा न करता समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना अमित साटम यांनी दिल्याचे समजते. पक्षाच्या अंतर्गत मतभेदांचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होऊ नये, याबाबतही त्यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले. ‘स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा,’ अशा शब्दांत साटम यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती आहे.

‘पक्षाची प्रतिमा मलीन होईल असे कृत्य करू नका’

महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची प्रतिमा खराब होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असेही अमित साटम यांनी बैठकीत स्पष्ट केले. मुंबईकरांनी आपल्याला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना

या बैठकीत मुंबई महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांना साटम यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती आहे. महापालिकेतील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, महापालिकेतील भाजपच्या दोन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षाध्यक्षांसमोरच झालेल्या या खडाजंगीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांवर अमित साटम यांनी दिलेल्या सूचनांनंतर परिस्थिती कशी बदलते, याकडे लक्ष लागले आहे.

 

Follow Us