मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल, गेम चेंजर प्लॅन ठरला, कशी असणार रणनिती?

ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी युवासेनेचे निरीक्षक ३६ विधानसभा मतदारसंघात नेमले आहेत. हे निरीक्षक स्थानिक पातळीवरील कामकाजाचा आढावा घेतील, शाखा आणि पदाधिकाऱ्यांची माहिती गोळा करतील आणि संघटनात्मक स्थितीचा अहवाल सादर करतील.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल, गेम चेंजर प्लॅन ठरला, कशी असणार रणनिती?
uddhav thackeray aaditya thackeray
| Updated on: Aug 11, 2025 | 12:30 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकींच्या कामाला लागले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या अनुषंगाने विविध गोष्टी सुरु आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने विधानसभा क्षेत्रांसाठी निरीक्षक नेमले होते. आता ठाकरे गटाच्या युवासेनेनेही कंबर कसली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत युवासेनेच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांना स्थानिक पातळीवरच्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने युवासेनेचे नवे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन युवासेनेच्या कामकाजाची तपासणी करतील. या तपासणीतून त्यांना महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी युवासेनेच्या संघटनात्मक स्थिती कशी आहे, याबद्दलची माहिती मिळेल. तसेच निरीक्षकांना मतदारसंघातील शाखांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सखोल माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये शाखा अधिकारी किती वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्या कामाचा अनुभव, आणि त्यांची वये यांसारख्या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे.

युवासेनेने नेमलेल्या निरीक्षकांची यादी

  • दहिसर विधानसभा: संदीप वरखडे, सतीश नरसिंग
  • मागाठाणे विधानसभा: हेमंत दूधवडकर, इमरान शेख
  • चारकोप विधानसभा: मयूर कांबळे, संतोष धोत्रे
  • अनुशक्ती नगर विधानसभा: मुकेश कोळी, पोपट बेदरकर
  • शिवडी विधानसभा: गीतेश राऊत, विश्वास पाटेकर
  • दिंडोशी विधानसभा: प्रथमेश सकपाळ, जसप्रीत सिंग वडेरा
  • अंधेरी पूर्व: संकेत सावंत, निलेश गवळी
  • वांद्रे पूर्व: बाळा लोकरे, दुर्गेश वैद्य
  • विक्रोळी: अजिंक्य धात्रक, रितेश सावंत
  • चांदिवली: अजित गावडे, आदित्य महाडिक

निरीक्षकांकडून या गोष्टींचा आढावा घेतला जाणार

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी त्यांच्या दौऱ्यात कोणत्या गोष्टींचा आढावा घ्यायचा, याची एक विस्तृत यादी तयार करण्यात आली आहे. यात शाखा अधिकारी आणि गट अधिकारी त्यांच्या पदावर कधीपासून आहेत, त्यांची वये आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्थिती तपासली जाईल. तसेच आवश्यक असल्यास नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी शिफारसी केल्या जातील. यासोबतच स्थानिक पातळीवर युवासेना आणि शिवसेना यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही, हे देखील तपासले जाईल. त्यासोबतच शाखा स्तरावर नियमित बैठका होतात का, शेवटची बैठक कधी झाली आणि एका महिन्यात किती वेळा बैठका होतात, याची माहिती घेतली जाईल.

तसेच मतदारसंघातील कॉलेजमध्ये युवासेनेची कॉलेज युनिट्स आहेत का, असल्यास त्यांची यादी आणि नसल्यास त्यामागची कारणे शोधली जातील. तसेच महिलांसाठी असलेल्या युवती सेनेची सध्याची स्थिती काय आहे, त्या सक्रिय आहेत का आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची यादीही तपासली जाईल. या निरीक्षकांच्या अहवालावर आधारित पुढील रणनीती ठरवली जाईल. यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना अधिक मजबूतपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.