
सध्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता प्रभादेवी येथील अत्यंत गजबजलेल्या परिसरातील साई सुंदर इमारतीजवळ शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि परिसरातील स्थानिक नागरिक यांच्यात वाद झाला. या इमारतीजवळ एका तात्पुरत्या स्वरूपातील शाखेच्या बांधकामावरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका वाढला की सरवणकर यांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली.
समाधान सरवणकर यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे एक कार्यालय या साई सुंदर परिसरात आहे. या कार्यालयासमोर पूर्वी तात्पुरत्या स्वरूपाचे एक छोटे शेड उभारण्यात आले होते. या तात्पुरत्या शेडच्या ठिकाणी आता कायमस्वरूपी आणि अधिक मोठे शेड उभारले जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी स्थानिकांनी या बांधकामाला विरोध करताना हे शेड अत्यंत अरुंद जागेत बांधले जात असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये ये-जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण करेल, अशी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच जीवनावश्यक सुरक्षिततेच्या कारणास्तव हे बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. त्यांनी या बांधकामाला विरोध करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे स्वतः आपल्या काही कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोहोचले. सरवणकर यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांचा रोष अधिक तीव्र होता. त्यांनी सरवणकर आणि बांधकामाविरोधात जोरात घोषणाबाजी सुरू केली.
नागरिकांच्या विरोधाची तीव्रता इतकी होती की, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे आणि विरोध अधिक तीव्र झाला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून समाधान सरवणकर यांना अखेरीस कोणताही वाद न वाढवता घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली. सरवणकर यांनी काढता पाय घेतल्यानंतर नागरिकांचा जमाव शांत झाला.