
राज्याचे महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. या धमकीमध्ये केवळ विधानभवनच नव्हे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो यांच्या नावाचाही समावेश आहे. या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण दक्षिण मुंबईत हाय अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्यानंतर आज संपूर्ण दक्षिण मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक पावलं उचलली आहेत. राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभरासाठी अभ्यागतांना विधिमंडळात प्रवेश बंदी केली आहे. तसेच, सर्व प्रकारचे प्रवेश पास तात्पुरते रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
विधिमंडळासोबतच आशियातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही (BSE) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी मिळाल्यानतंर आता मुंबई पोलिसांनी तातडीने बीएसई इमारतीत शोधकार्य सुरु केले आहे. सध्या राज्य राखीव पोलीस बल (SRPF), बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकाकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बीएसईच्या आत दोन विशेष पथके तैनात केली आहेत. यासोबतच प्रत्येक मजल्याची झाडाझडती घेतली जात आहे. इमारतीच्या बाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. हा धमकीचा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला, याचा तपास आता सायबर सेल आणि गुन्हे शाखेकडून केला जात आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच ही धमकी आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर पावले उचलली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ६ वाजून ५७ मिनिटांनी ‘सीपीए’च्या (CPA) अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. यामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्षाचा संदर्भ देत खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून गृह विभागाने तातडीने तपासाचे आदेश दिले. विधानभवन, हायकोर्ट आणि बीएसई परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. पूर्ण तपासणीनंतर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच लोकप्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला. आमदार पंकज भोयर यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार हा ईमेल खोटी (Hoax) असण्याची शक्यता आहे, तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
दरम्यान हा ईमेल कोणाच्या आयडीवरून आला आणि त्यामागे कोणत्या विकृत प्रवृत्तीचा हात आहे, याचा शोध मुंबई पोलीस आणि सायबर सेल घेत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात अशा प्रकारची धमकी आल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तरीही पोलिसांनी नागरिकांना भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे.