Central Railway : BMC चा संथ स्पीड, मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवसाने वाढला, मुंबईकरांचे हाल

Central Railway : शनिवार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी नियोजित पॉवर ब्लॉक घेण्यात आला. तो सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालणार होता. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यानं आणि गर्डर बसवण्याच्या कामात काही तांत्रिक त्रुटी आल्या.

Central Railway : BMC चा संथ स्पीड, मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवसाने वाढला, मुंबईकरांचे हाल
central railway
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 27, 2025 | 11:54 AM

मुंबई महापालिकेने कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्याप वेळेत पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागणार आहे. मध्य रेल्वेनं कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याकरता शनिवारी आणि रविवारी रात्री पॉवर ब्लॉक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, या पुलाचे काम अद्याप न झाल्यानं आता ब्लॉक कालावधी आणखी दोन दिवसांसाठी वाढला असून, मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच ब्लॉकनं सुरू झाली आहे.

मस्जिद बंदर येथील 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. पुलाचा गर्डर बसवण्याकरिता ब्लॉक घेण्याची विनंती पालिकेनं रेल्वेला केली होती. या पुलाच्या कामासाठी रेल्वेनं 25, 26, 27 जानेवारी ते 1, 2, 3 फेब्रुवारी दरम्यान कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा व हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक जाहीर केला.

काम संथगतीनं

शनिवार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी नियोजित पॉवर ब्लॉक घेण्यात आला. तो सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालणार होता. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यानं आणि गर्डर बसवण्याच्या कामात काही तांत्रिक त्रुटी आल्यानं काम संथ गतीनं सुरू आहे. रात्री दहा वाजता जे काम सुरू होणं अपेक्षित होतं, ते काम सुरू होण्यास अधिकचा वेळ लागला. या गर्डर बसवण्याच्या कामात एक व्यक्ती जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळं रेल्वेला शनिवारचा रात्रकालीन ब्लॉक अचानक वाढवण्याची वेळ आली. हा पॉवर ब्लॉक सकाळी दहा वाजेपर्यंत चालला.

गर्डर बसवण्याच काम अपूर्ण

पालिकेचं गर्डर बसवण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं पालिकेच्या या कामासाठी मध्य रेल्वेला आणखी दोन दिवसरात्र कालीन ब्लॉक घ्यावा लागणार आहे. आजचा म्हणजे रविवारचा रात्रकालीन ब्लॉक हा रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालणार आहे. याचा परिणाम म्हणजे शनिवार आणि रविवारी सोसावा लागलेला मेगा ब्लॉकचा त्रास मुंबईकरांना आता सोमवार आणि मंगळवारी देखील सोसावा लागणार आहे.

एक व्यक्ती जखमी

कर्नाक ब्रिजवर गर्डर लाँच करण्यासाठी पालिकेनं घेतलेला ब्लॉक अजून रद्द केलेला नाही. गर्डर लाँच करत असताना काही अडचणी आल्या, आणि यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली आहे. उपनगरीय लोकल सेवा दादर/भायखळा मुख्य मार्गावर आणि वडाळा रोडवर हार्बर मार्गावर सुरू आहे, आणि ब्लॉक पूर्ण होईपर्यंत ती अशीच सुरू राहील. अपघातांमुळे एक कामगार जखमी झाला आहे. प्रेशर जॅक स्लीप 15 मीटर रोलिंग झाले आहे. घटनेचा तपास सुरू आहे आणि काम लवकर सुरू होईल. या पुलाचे काम आणखी बाकी असल्याने रात्रकालीन पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवस वाढवावा लागणार आहे.