
गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेताना पाहायला मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातच मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरली आहे. आज सकाळी सांताक्रूझ वेधशाळेत 16.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. जे गेल्या ११ वर्षांतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. यामुळे यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील आजची सकाळ गेल्या दहा वर्षातील सर्वात थंड सकाळ म्हणून नोंदवली गेली आहे.
मुंबईच्या या तापमानाने ११ नोव्हेंबर २०१६ मधील नीचांक मोडला आहे. या काळात सरासरी तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवण्यात आले होते. या किमान तापमानाने थेट पाच अंशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकर थंडीने अक्षरशः कुडकुडले. केवळ मुंबईतच नाही, बदलापूरसारख्या उपनगरात पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे बदलापूर अक्षरशः महाबळेश्वरप्रमाणे गारठून गेले होते. मुंबईत थंडी वाढल्यामुळे आज सकाळपासूनच धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिणामी हवेची गुणवत्ता खालावून AQI १७० पर्यंत पोहोचला आहे.
| ठिकाण | किमान तापमान (∘C) | |
| सांताक्रूझ | १६.२ | ११ वर्षांतील नीचांक |
| कुलाबा | २१.६ | |
| बदलापूर | ११.० | |
| पुणे | ९.४ | राज्यातील थंड शहरांपैकी एक |
| लोणी काळभोर | ६.९ | राज्यातील सर्वात कमी तापमान |
यंदा नोव्हेंबरमध्येच थंडी वाढण्यामागे अनेक कारण समोर आली आहेत. सध्या मध्य आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने हे थंड वारे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांच्या परिणामामुळे वातावरणातील बाष्पाचा अभाव वाढला आहे. ज्यामुळे थंडीची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासोबतच मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाल्यामुळे वातावरणातील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. ज्यामुळे थंडीची चाहूल लवकर लागली आहे.
जागतिक हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा ला-नीना हवामान प्रक्रिया अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. ला-नीना कार्यकरत झाल्यास तापमानात मोठी घट होते आणि यंदा नेहमीपेक्षा जास्त कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे.