EXCLUSIVE VIDEO | मुंबईत अविघ्न टॉवरमध्ये आग, जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

| Updated on: Oct 22, 2021 | 1:36 PM

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे.

EXCLUSIVE VIDEO | मुंबईत अविघ्न टॉवरमध्ये आग, जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू
इमारतीतून रहिवासी खाली कोसळला
Follow us on

मुंबई : मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी उंचावरुन खाली पडल्याने तो मृत्युमुखी पडला. ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्याला प्राण गमवावे लागले.

पाहा व्हिडीओ : (या व्हिडीओमधील दृश्यं तुमचं लक्ष विचलित करु शकतात)

नेमकं काय घडलं?

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर विसाव्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

19 व्या मजल्यावर आग, 20 व्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने काय सांगितलं?

अविघ्न पार्कमधील 19 व्या मजल्यावर आग आगली. मी रहायला 20 व्या मजल्यावर आहे. मला जसे आगीचे लोट दिसले, तसे मी लगोलग खाली उतरले. इतरांनाही आगीची माहिती दिली. आगीची भीषणता खूपच होती. माझ्या माहितीप्रमाणे 19 व्या मजल्यावर कुठेतरी फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागली. परंतु बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक फायर सिस्टम आहे. रहिवासी इमारत असल्याने नागरिक अडकल्याची भीती आहे. परंतु रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण झालेलं आहे. नागरिक अडकल्याची भीती राहिलेली नाही.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?

अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल काय म्हणाले?

अविघ्न इमारतीच्या 19 व्या आणि 20 व्या मजल्यावर आग जास्त पसरली. काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करु. अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

Mumbai Avighna Tower Fire Live | मुंबईत करी रोड भागात अविघ्न टॉवरमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी

आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणतात, सोसायटी मॅनेजमेंट, सिक्युरिटीवर कारवाई होणार