मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होणार

Mumbai Metro: सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच टप्पा 2 अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे. हा मेट्रो टप्पा सुरु झाला तर दादर आणि वरळीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचा आणखी एक टप्पा सुरु होणार
Mumbai Metro
| Updated on: Apr 15, 2025 | 2:10 PM

Mumbai Metro: मुंबई मेट्रोची एक्वा लाइन म्हणजे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गासंदर्भात चांगली बातमी आली आहे. दादर आणि वरळीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 2 अ टप्पा वाहतूक सेवेत लवकरच दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून थेट वरळीला, आचार्य अत्रे चौकापर्यंत पोहचणे सोपे होणार आहे. या टप्याच्या निरीक्षणासाठी अखेर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाकडून बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या मार्गिकेचे निरीक्षण करून या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे.

थेट भुयारी मेट्रोने वरळी गाठता येणार

मुंबई मेट्रोची लाइन 3 कुलाबा-वांद्रे ही 33.5 किमी आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो आहे. यामध्ये 27 भूमिगत स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पामुळे वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची गर्दी कमी होईल. आता या मेट्रोच्या आणखी एक टप्पा सुरु होणार आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रो केसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापर्यंत धावणार आहे.

सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच टप्पा 2 अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे. हा मेट्रो टप्पा सुरु झाला तर दादर आणि वरळीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पहिला टप्पा 2024 मध्ये झाला सुरु

मुंबई मेट्रोचे काम मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून 33.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. हा संपूर्ण मार्ग नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाला असता तर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता. परंतु पहिला टप्पा सुरु होण्यास उशीर झाला. या मार्गिकेचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 मध्ये सुरु झाला. त्यानंतर अजूनही फारसा प्रतिसाद या मार्गावर प्रवाशांकडून मिळत नाही.