
देशातील एकमेव मोनेरेल ही मुंबईत असून चेंबूर ते सात रस्ता या मार्गावर ती धावते. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अपघतांमुळे एमएमआरडीने मोनोरेल सेवा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. आता ही मोनोरेल सेवा नेमकी कधी बंद होणार? त्यामध्ये काय बदल होणार आहेत चला जाणून घेऊया त्याविषयी…
मोनोरेलची तांत्रिक प्रणाली अपग्रेडेशन आणि भविष्यातील कार्यक्षमतेसाठी एमएमआरडीएने हे मोठे पाऊल उचलले आहे. येत्या २० सप्टेंबरपासून म्हणजे येत्या २ दिवसात मोनो सेवा स्थगित केली जाणार आहे. स्थगिती काळात काही परिक्षणं, सुरक्षेकरता नवी प्रणाली, आधुनिकीकरण यावर काम करण्यात येणार आहे. मात्र, मोनोरेल सेवा किती महिन्यांसाठी बंद राहणार आहे याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने खरोखरच ॲसिडिटीची समस्या कमी होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
मोनोरेल सेवा का थांबवली जात आहे?
दररोज सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० पर्यंत मोनोरेल सेवा चालू असतात. केवळ 3.5 तासच रात्री ही सेवा बंद असते. एवढा मोठ्या कामासाठी हा वेळ खूपच कमी आहे. सेफ्टी प्रोटोकॉलनुसार पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज करणे व पुन्हा रिचार्ज करणे ही कामे या कालावधीत करणे अवघड होते. तसेच नवीन रेक्स आणि सिग्नलिंग सिस्टीमच्या स्थापनेसाठी अखंडित वेळ हवा आहे आणि जुन्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करून त्यांना नव्या सारखे बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे मोनोरेल सेवा काही महिन्यांसाठी बंद करण्यात ठेवण्यात येणार आहे.
कोणत्या महत्त्वाच्या सुधारणा होणार?
-नवीन ‘रोलिंग स्टॉक’ प्रगत CBTC सिग्नलिंग प्रणाली मोनोरेलमध्ये बसवण्यात येणार आहेत
-अत्याधुनिक CBTC (Communication-Based Train Control) प्रणालीचा समावेश मोनोरेलमध्ये केला जाणार आहे
-5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग-32 ठिकाणी बसवण्यात आले असून चाचणी सुरू आहे
-260 नवे Wi-Fi ॲक्सेस पॉइंट्स, 500 RFID टॅग्स, 90 ट्रेन डिटेक्शन युनिट्स आणि अनेक WATC युनिट्स आधीच बसवले गेले आहेत
-वे साइड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले असून एकात्मिक चाचणी सुरू आहे
नव्या गाड्या धावणार
-8 रेक्स मुंबईत पोहोचले आहेत
-9वा रेक तपासणीसाठी सज्ज आहे
-10 वा रेक तयार करण्याचे काम सुरू आहे
2460 कोटी रुपये खर्च करत देशातील पहिली मोनोरेल उभारण्यात आली. एका मोनोरेल गाडीची प्रवासी संख्या 562 आहे. संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या मोनोरेलवर नादुरुस्त गाड्यांमुळे अलिकडे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्यामुळे एमएमआरडीएने चौकशी समितीही नेमली आहे. 20 सप्टेंबर रोजी बंद होणारी मोनोरेल पुन्हा कधी सुरु होणार याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.