ऐन सणासुदीच्या वेळी मुंबईत पाणीकपात, जलवाहिनीला मोठी गळती

मुंबईतील मुलुंड पश्चिम भागातील १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीत मोठी गळती झाल्याने १०-१२ तास पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अमर नगर, खिंडीपाडा आदी अनेक परिसर प्रभावित आहेत. महानगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

ऐन सणासुदीच्या वेळी मुंबईत पाणीकपात, जलवाहिनीला मोठी गळती
water
| Updated on: Mar 30, 2025 | 3:24 PM

सध्या राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम भागातील टी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या महत्त्वाच्या जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली आहे. भांडुप पश्चिमेकडील तानसा जलवाहिनीजवळ ही गळती झाली आहे. यामुळे टी विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

१० ते १२ तासांचा कालावधी लागणार

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या उत्साहात असतानाच नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पाणीकपात कोणकोणत्या भागात?

त्यामुळे मुलुंड पश्चिमेकडील अमर नगर, खिंडीपाडा, जीजीएस मार्गावरील परिसर, मुलुंड कॉलनीचा परिसर, राहुल नगर, शंकर टेकडी, हनुमानपाडा, मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, घाटीपाडा, बी आर रोड आणि एस विभागातील खिंडीपाडा, नजमा नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना फटका बसणार आहे. सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्या देखरेखेखाली युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीच्या कामात सहकार्य करावे असे विनम्र आवाहनही केले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.