मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, यंदा किती रुपये मिळणार?
मुंबई महापालिकेनेही आता दिवाळी बोनस जाहीर केले आहे. यंदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतत महपौर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही आहे.

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महानगरपालिकांपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी 33 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी 31 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. दरम्यान, यावर्षी बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे 300 कोटींपेक्षा जास्त भार पडणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कर्चाऱ्यांनाही यावर्षी दिवाळीत किती बोनस मिळणार याची उत्सुकता होती. दिवाळी तोंडावर आली की, मुंबई महापालिकेतील विविध संघटना मोठमोठ्या आकड्यांना समोर करुन पालिकेकडे बोनसची मागणी करतात. त्यानंतर कामगार संघटनांना प्रशासन चर्चेचं आमंत्रण देते. मग त्यातून मार्ग काढून सत्ताधारी पक्षाच्या मध्यस्थीनंतर बोनस जाहीर केला जातो, अशी अनेक वर्षांपासून परंपरा सुरु आहे. पण यावर्षी मात्र यामध्ये बदल पाहायला मिळाला. यंदा बोनसची आकडेवारी महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही बोनसची रक्कम जमा होणार असून, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अधिकृत घोषणा बाकी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दीपावली 2026 निमित्त अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी हा बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिकृत माहिती देणार आहेत.
गेल्या वर्षी किती मिळाला होता बोनस?
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त 31,000 रुपयांचा बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात वाढ करून 33,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत अधिक रक्कम मिळणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकांकडून कर्मचाऱ्यांसाठी बोनसच्या घोषणा केल्या जात आहेत. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिकांनंतर मुंबई महापालिकेनेही बोनस जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता महापौरांच्या पत्रकार परिषदेत याबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.