
राज्यात आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी या नवरात्रीनिमित्तचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गरबा, दांडिया रास यांशिवाय नवरात्रोत्सव पूर्णच होऊ शकत नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या सन्मानार्थ गरबा खेळला जातो. यावेळी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून, हातात लाकडी दांड्या घेऊन वर्तुळाकारात नाचले जाते. या नृत्याद्वारे लोक देवीची पूजा करतात आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. यंदा मुंबईत बहुतांश ठिकाणी नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रीनिमित्त यंदा अनेक लोकप्रिय गरबा कार्यक्रम इनडोअर साजरे केले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा नवरात्रीत पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मैदानात चिखल होतो आणि गरबा खेळण्यासाठी आलेल्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होते. याच कारणामुळे यंदा अनेक ठिकाणी इनडोअर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे रात्री उशिरापर्यंत नृत्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
मुंबईतील दांडिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनी पाठक यांचा कार्यक्रम यंदा प्रथमच बोरिवली सोडून बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. त्यांच्या कार्यक्रमाची फी प्रति दिवस 1,799 रुपये आहे. या कार्यक्रमासाठी खासगी पोड्सची सोय देखील करण्यात आली आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार्थिव गोहिल यांच्या आवाजात ‘रंगिलो रे नवरात्री’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हा गरबा इनडोअर गरबाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. याची एका दिवसाची फी 999 रुपये आहे. बोरीवलीतील अरुणकुमार वैद्य मैदानात गरबा प्रिन्सेस ऐश्वर्या मुजुमदार यांच्या रंगताळी कार्यक्रमाची धूम पाहायला मिळणार आहे. यासाठी मुंबईतील सर्वात मोठा एसी डोम उभारण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईत वरळीच्या एसव्हीपी स्टेडियममधील ‘डोम दांडिया नाईट्स’ हे आकर्षण ठरत आहे. रिया भट्टाचार्य यांच्यासोबत येथे गरबा करण्याची संधी चाहत्यांना उपलब्ध होणार आहे. यासाठी 799 रुपये तिकीट असणार आहे. याशिवाय, बोरीवलीमध्ये भूमी त्रिवेदी यांचा ‘रंग रास नवरात्री’ आणि गीता रबारी यांचा ‘शो ग्लिट्झ नवरात्री उत्सव’ हे गरब्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याची फी 499 रुपये इतकी आहे.
केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबई, मुलुंड आणि मालाड येथेही गरबाप्रेमींसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. ठाण्यातील रेमंड ग्राउंडवर ‘ठाणे रास रंग’चे आयोजन करण्यात आले आहे. याची फी 590 रुपये असणार आहे. तर मुलुंड येथील कालिदास ग्राउंडवर प्रेरणा रासची फी 400 रुपये आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या नऊ दिवसांत पारंपरिक पोशाखात सजलेले मुंबईकर गरबा-दांडियाच्या तालावर मनसोक्त थिरकताना दिसणार आहेत.