
मुंबई / 9 ऑगस्ट 2023 : भरधाव कारने सायकलस्वारासह रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला धडक दिली. या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. अनंत येसू संखे असे मयत सायकलस्वाराचे नाव आहे. तर देवांग शहा आणि पूजा शहा अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (उडफडणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे), 304 ए (निष्काळजीपणाने मृत्यू ओढवणे) आणि 338 (उडताळणीच्या कृतीतून इतरांचे जीव धोक्यात घालणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील पोदार शाळेजवळ पुस्तकांच्या दुकानाबाहेर दोघे बहिण, भाऊ रविवारी आपल्या गाडीत बसले होते. यावेळी त्यांना समोरुन भरधाव वेगात एक कार येताना दिसली. मात्र काही कळायच्या आत कारने आधी सायकलस्वाराला उडवले, मग त्यांच्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. यानंतर गाडी चालक न थांबता तेथून निघून गेला.
जखमी शहा भावंडांनी जखमी सायकलस्वाराला खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जखमींनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडीच्या नंबरवरुन मालकाची माहिती काढली. यानंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.