
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका टँकर अपघातामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या १५ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक अवजड टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला. आडोशी बोगद्याच्या वळणावर हा अपघात झाला. या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस होता. टँकर पलटी होताच गॅसची गळती सुरू झाली. महामार्ग पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
गळती होत असलेला गॅस अत्यंत ज्वालाग्रही असल्याने कोणतीही ठिणगी मोठी दुर्घटना घडवू शकते. ही जोखीम लक्षात घेऊन घटनास्थळी केमिकल एक्सपर्टचे विशेष पथक पाचारण करण्यात आले आहे. हे पथक अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने टँकरमधील गळती रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत ही गळती पूर्णपणे थांबत नाही आणि टँकर सुरक्षितरित्या बाजूला केला जात नाही, तोपर्यंत रस्ता पूर्णपणे खुला करणे धोक्याचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सध्या पुणे ते मुंबई दरम्यानची वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. १५ तासांनंतर सध्या केवळ एक लेन संथ गतीने सुरू करण्यात आली आहे. सर्व अवजड वाहनांना एक्सप्रेस-वेवरच सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले आहे. यामुळे महामार्गावर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हलकी चारचाकी वाहने आणि प्रवासी बसेस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (NH-48) बोरघाटामार्गे खोपोलीकडे वळवण्यात आली आहेत. मात्र, या मार्गावरही वाहनांचा भार वाढल्याने संथ गतीने वाहतूक सुरू आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे पहिले प्राधान्य आहे. गॅस गळती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत एक्सप्रेस-वेचा प्रवास टाळणे हिताचे ठरेल. अत्यावश्यक काम असल्यास जुन्या महामार्गाचा वापर करावा किंवा परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे.